जा आणि माफी मागा! कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने भाजप मंत्री शहांना फटकारले

कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sofiya Qureshi) यांच्याविरुद्धच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज मध्य प्रदेशातील भाजपचें मंत्री विजय शहा (Vijay Shah) यांना चांगलेच फटकारले.

‘जा आणि माफी मागा. थोडीशी संवेदनशीलता दाखवा’, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

हिंदुस्थानचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी मंत्र्यांकडून अशी विधाने अपेक्षित नसून असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. सरन्यायाधीश गवई यांनी म्हटले आहे की, संवैधानिक पदांवर असलेल्या व्यक्तींनी भाषण करताना संयम राखणे आवश्यक आहे.

मुख्य न्यायाधीश गवई यांनी शहा यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले, ‘तुम्ही कोणत्या प्रकारची विधानं करत आहात? तुम्ही थोडी संवेदनशीलता दाखवली पाहिजे. उच्च न्यायालयात जाऊन माफी मागा’.

विरोधी पक्ष, लष्करी माजी सैनिक आणि सत्ताधारी भाजपच्याच अन्य सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर मंत्री विजय शहा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशांना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.