पाऊसहल्ला! मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला झोडपले; नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटीने हाहाकार, सहा गावांचा संपर्क तुटला

मुसळधार पावसाने आज मुंबई-कोकणसह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढत ‘हल्ला’च केला. मुंबईत अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक गाडय़ा पाण्यातच बंद पडल्या. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्ग ठप्प पडले तर पश्चिम रेल्वे 10 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती. पाऊस इतका भयंकर होता की सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टीही जाहीर करण्यात आली. दरम्यान, ढगफुटी झाल्याने नांदेडच्या मुखेडमध्ये सहा गावांचा संपर्क तुटला असून पाचजण बेपत्ता आहेत. मराठवाडय़ात पावसाने सहा बळी घेतले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातून चार लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर कोकणातही नद्यांनी ‘इशारा पातळी’ ओलांडल्याने प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. यातच हवामान खात्याने उद्यादेखील मुंबई शहर, दोन्ही उपनगरे, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगडसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

मुंबईत रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी सकाळपासून रौद्ररूप धारण केले. पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने सकाळी कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे हाल झाले. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशी तासन्तास वाहनांमध्येच अडकून पडले. अनेक रस्त्यांवर पाणी तुंबल्याने काही बेस्ट मार्ग बंद करण्यात आले, तर काही मार्ग इतर मार्गावर वळवण्यात आले. चेंबूरमध्ये पालिकेच्या रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला, तर चेंबूरमध्ये दरडीवरील पाच ते सहा झोपडय़ा अतिवृष्टीमुळे कोसळल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • सिंधुदुर्ग जिह्यात भातशेती मोठय़ा प्रमाणात पाण्याखाली गेली असून शेतकऱयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कणकवलीत जाणवली नदीसह सावंतवाडीतील तेरेखोल आणि दोडामार्गातील तिलारी नदीला पूर आला आहे.
  • संगमेश्वर तालुक्यात रविवारी रात्री 7.30 वा. खंडित झालेला वीजपुरवठा 21 तास बंद होता.
  • सावंतवाडी तालुक्यातील चितारळी येथे सुनंदा आणि माई बांदेकर यांच्या बंद घराची भिंत कोसळून दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे
  • रत्नागिरी जिह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी आश्रमशाळा आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर

हवामान खात्याने उद्या मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा दिल्याने मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठाणे, रायगड, पालघर या जिल्हय़ांमध्येही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शाळेच्या बसमध्ये अडकलेल्या मुलांसाठी पोलीस बनले देवदूत

पाऊस थोडय़ा वेळाने विश्रांती घेईल, असा अंदाज बांधत शाळा, महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना कुठलीही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवून दिले. पावसाचा जोर ओसरण्याचे चिन्ह नसल्याने शिवाय पाणी तुंबू लागल्याने शाळा काही वेळातच सोडून देण्यात आल्या. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची बस माटुंगा पोलीस ठाणे परिसरात येऊन तुंबलेल्या पाण्यात अडकली. तेव्हा माटुंगा पोलिसांनी तत्काळ बसच्या दिशेने धाव घेतली. बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अंगाखांद्यावर घेऊन पोलिसांनी तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत पोलीस ठाणे गाठले. मग पोलीस ठाण्यात नेल्यावर मुलांना खाऊ देऊन त्यांच्याशी हितगुज केले.