इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात परभणीत कडकडीत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

इंधन दरवाढ कमी करावी आणि वाढत्या महागाईला विरोध करण्यासाठी सोमवार, १० सप्टेंबर रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रससह २१ पक्षांनी बंदच्या आवाहनास परभणीत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळला. हा बंद अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडला असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी रस्त्यावर उतरुन शासनाच्या ध्येय धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमला.

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात काँगेससह अन्य २१ विरोधी पक्षांनी हिंदुस्थान बंदची हाक दिली होती. महाराष्ट्रात सर्व पक्षीयांनी बंद मध्ये सहभागी व्हावे, यासाठी काँग्रेसने पुढकार घेतला. सकाळपासूनच परभणी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. हिंदुस्थान बंदमुळे एस.टी. महामंडळाने सोमवारी दुपारी ३ वाजेनंतर एस.टी. बससेवा चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने ही सेवा बंद ठेवण्यात आली होती. शहरातील हॉटेल्स, अ‍ॅटोरिक्षा वाहतुक आदी बंद होती.

पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये भाजपा सरकारच्या कर वाढविण्याच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. ऑगस्ट २०१४ साली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती १०५ डॉलर प्रति बॅरल असताना ५६ रुपये प्रति लिटर पेट्रोलचा भाव होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात ६७ डॉलर प्रति बॅरल असताना केवळ भाजपा केंद्र व राज्य शासनाच्या एक्साईज डयुटी व व्हॅट वाढीव करामुळे जनतेची प्रचंड लूट भाजपा सरकारने चालविली आहे.

परभणी जिल्ह्यात देशातील सर्वात महागडे पेट्रोल ८९.७७ पैसे तर डिझेल ७७.७१ पैसे, गॅस ८५० रुपये दराने परभणीतील जनतेच्या माथी मारण्यात येत आहे. जीएसटीमुळे जनतेला आर्थिक संकटात मोदी सरकारने ढकलले आहे. पेट्रोल, डिझेल जीएसटी खाली आणल्यास पेट्रोल व डिझेलचे दर कमी करता येतील. पण भाजपा सरकारची इच्छा नाही. राफेल या लढाऊ विमान खरेदीमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स या सार्वजनिक उद्योगातील कंपनीला ३० हजार कोटी रुपयांचा मुनाफा करून देण्यासाठी युध्द विमानांची किंमत ५५० कोटीवरून १६५० कोटी रुपये वाढविण्यात आली. या संरक्षण साहित्य खरेदी घोटाळ्यातून देशातील जनतेचा विश्वासघात करण्यात आला आहे. अनिल अंबानीच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने भाजपा सरकारला हाताशी धरून शेतकऱ्यांशी विश्वासघात केला आहे. या अंबानीच्या विमा कंपनीने विमा न दिल्याने १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या परभणी जिल्ह्यात घडल्या आहेत. यामध्ये भाजपा मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द देखील पाळला नाही. या पार्श्वभूमीवर परभणी शहर जिल्हा आज कडकडीत बंद होता.

या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, राकाँचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, उपमहापौर माजुलाला, मनपा गटनेते भगवान वाघमारे, कॉ. राजन क्षीरसागर, मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, समाजवार्दी पार्टींचे सचिव अलताफ मेमन, समाजवादीचे जिल्हाध्यक्ष मन्सूर खान, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन अंबिलवादे यांनी केला. आज सोमवारी हिंदुस्थान बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंद आंदोलनात हिंदुस्थानीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, हिंदुस्थानीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप, मनसे, रिपब्लिकन पक्ष व संघटना सहभागी झाले होते. बाळासाहेब देशमुख, अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात शहराध्यक्षा नंदाताई राठोड यांच्यासह रेखाताई आवटे, मुन्ना शेख, संगीता पवार, विद्या जोंधळे, रुबिना शेख, राधाबाई जोंधळे, आशाबाई कांबळे, शीला मस्के, आसेफा शेख, प्रयागबाई पवळे, शशिकला गायकवाड आदी सहभागी झाले होते.