कर्जमुक्तीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चाची धडक! हजारो शेतकऱ्यांचा सहभाग, शिवसेनेच्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या, शेतीसाठी मोफत वीज द्या, अशी मागणी करत वाशीममधील शेतकऱ्यांनी ट्रक्टर मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली. शिवसेना खासदार संजय देशमुख, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप जाधव यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाला जिह्यातील हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला.

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती येथून ट्रक्टर मोर्चाला सुरुवात होऊन पुसद नाका, पोस्ट ऑफिस, पाटणी चौक अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी जिह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेना खासदार संजय देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत महायुतीने विधानसभा निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनांची आठवण सरकारला करून दिली. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे वाडलेले बियाणे, खते, औषधे, मजुरीचे दर आणि शेतमालाला नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी केली.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी वाशीमध्ये शिवसेनेने काढलेल्या मोर्चात शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, माजी जिल्हाप्रमुख राजेश पाटील राऊत, सिद्धार्थ देवळे, तालुका प्रमुख रामदास मते पाटील, कॅप्टन प्रशांत पाटील, विश्वनाथ सानप, चंद्रशेखर देशमुख, अनिल राठोड, बालाजी वानखेडे, अशोक अंभोरे, गोपाल पाटील यवतकर, रवी पाटील, सुभाष बोरकर, पांडुरंग पांढरे यांच्यासह शिवसेना महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा

महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पीक विमा, शेतीसाठी मोफत वीज, शेतमालाला भाव आदी घोषणा जाहीरनाम्यात केल्या होत्या. त्याची पूर्तता करा, अशी मागणी या वेळी केली.