
हिंदुस्थानातील सर्वात व्यस्त असलेल्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली. हवाई वाहतूक मंदावल्याने हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टममध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे 300 हून अधिक विमानांचे उड्डाण उशिराने झाले. तर एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये आलेल्या समस्येमुळे आतापर्यंत 200 हून अधिक विमानांचे दोन ते अडीच तासांहून अधिक उशिराने उड्डाण करण्यात आले. दरभंगाच्या स्पाइसजेटचे उड्डाण रद्द करण्यात आले. तसेच काही छोट्या शहरातील उड्डाण पाच ते सात तासांपर्यंतच्या विलंबाने करण्यात आले.
दिल्ली ते वाराणसीचे विमान साडेसात तास उशिराने उड्डाण करण्यात आले. इंडिगोचे डेहराडूनला जाणारे विमानही पाच तास उशिराने उड्डाण करण्यात आले. या तांत्रिक समस्यांचा परिणाम झाल्यानंतर विमान कंपनी इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट आणि अकासा एअर यांनी प्रवाशांसाठी सूचना जारी केली. दिल्लीतील एटीसी बिघाडामुळे विमाने उशिराने धावत आहेत, असे सांगितले. दिल्लीच्या धावपट्टीवर पार्किंगची जागा अपुरी असल्याने विमान कंपन्यांना काही विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. दिल्ली विमानतळावरील फ्लाइट ऑपरेशनमध्ये ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानांच्या उड्डाणांना विलंब होत आहे, अशी माहिती एअरपोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने देखील याची गंभीर दखल घेत फ्लाइटला विलंब होत असल्याची कबुली दिली. दिल्ली विमानतळावर दररोज 1 हजार 500 हून अधिक विमानांचे व्यवस्थापन केले जाते.
विमान कंपन्यांकडून दिलगिरी
एअर इंडिया आणि स्पाइसजेटसह अन्य काही एअरलाइन्सने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल डेटाला सपोर्ट करणारी ऑटोमेटिक मेसेज स्विचिंग सिस्टम (एएमएएसएस) मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे त्यांनी म्हटले.



























































