
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत 2023 मध्ये महाराष्ट्रातून मुलींमधून प्रथम येण्याचा मान अश्विनी केदारी या तरुणीने पटकावला. परंतु, एवढय़ा यशावरच न थांबता तिने जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यादृष्टीने तिने तयारीही सुरू केली. मात्र एका आकस्मिक घटनेत उकळत्या पाण्याचा ड्रम अंगावर पडून 80 टक्के भाजल्याने या कर्तृत्ववान तरूणीचा मृत्यु झाला. अश्विनी यांच्या आकस्मिक मृत्यूने खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी होत्या. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून त्या प्रथम आल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यादृष्टीने यूपीएससी परीक्षेचा अभ्यासही त्यांनी सुरू केला. दररोज पहाटे लवकर उठून त्या अभ्यास करीत असत. 28 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता अश्विनी यांनी इलेक्ट्रिक हीटरद्वारे प्लास्टिक ड्रममध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. हीटर बंद करण्याचे विसरून त्या झोपी गेल्या.
पाणी जास्त गरम झाल्याने उकळल्याचा आवाज आल्याने पहाटे तीनच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यांनी तत्काळ हीटरचे बटण बंद केले. प्लास्टिकचा ड्रम फुटून गरम पाणी अंगावर पडल्याने त्या 80 टक्के भाजल्या. रुग्णालयात 11 दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. उपचारादरम्यान रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला.