
देशातील स्पॅम कॉल्सचे वाढते प्रमाण आणि फसवणुकीचे मॅसेज पाहता भारतीय दूरसंचार नियामक म्हणजे ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना काही कडक निर्देश लागू केले आहेत. सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सनी आपली एआय आणि मशीन लार्ंनग प्रणाली आणखी प्रभावी करून संशयित हालचालींवर त्वरित पावले उचलावी असे निर्देश 27 जानेवारी रोजी देण्यात आले आहेत. डिजिटल फसवणुकीला आळा घालून त्यावर जलद कारवाई व्हावी, हा यामागील उद्देश आहे.
नव्या नियमांनुसार, जर एखाद्या कंपनीच्या एआय प्रणालीला एखादा नंबर संशयित आढळला, तर त्या माहितीला दोन तासांच्या आत दुसऱ्या ऑपरेटरसोबत शेअर करावी लागेल. ही पूर्ण प्रक्रिया ब्लॉक चेन आधारित डीएलटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होईल. त्याद्वारे रेकॉर्ड सुरक्षित राहतील. त्यामुळे एखाद्या नंबरची तक्रार येण्याची वाट न पाहता त्यावर कारवाई सुरू होईल. अशा प्रकरणात टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवसांच्या आत आवश्यक कारवाई करावी लागेल.
कॉल करणारा आणि रिसीव्ह करणारा ऑपरेटर दोन्ही जबाबदार
स्पॅम कॉलप्रकरणी केवळ एका कंपनीवर जबाबदारी नसेल. ज्या नेटवर्कवरून संशयित कॉल करण्यात आला आणि ज्या नेटवर्कवर कॉल गेला, अशा दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर्सना मिळून कारवाई करावी लागेल. एआय सिस्टिम कॉल लाइन आयडेंटिफिकेशन स्तरावर संशयित हालचाली ओळखेल.
…तर नंबर ब्लॉक
जर एखाद्या मोबाईल नंबरच्या विरोधात पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा तक्रारी आल्या तर संबंधित ऑपरेटरला त्वरित पावले उचलावी लागतील. त्या नंबरला तात्पुरते किंवा कायमस्वरूपी ब्लॉक केले जाऊ शकते, जेणेकरून पुढील फसवणूक टळेल. यूपीआय फ्रॉड, खोटे बँक मॅसेज, कर्ज आणि खोटी केवायसीसारख्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी ही पावले उचलली आहेत.
























































