तीन तास रेल्वे उशिरा धावल्याने वकिलाने ठोठावला ग्राहक मंचाचा दरवाजा, तीन वर्षाने मिळाला न्याय

रेल्वे गाड्या उशिराने धावणे हे काही हिंदुस्थानियांसाठी नवीन नाही. त्यात अर्धा एक तास गाड्या उशीरा धावणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र जबलपूरमधून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. ट्रेन तीन तास उशीरा धावल्याने एका प्रवासी वकिलाने चक्क ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावला आहे आणि तब्बल तीन वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला आहे.

अरुण कुमार जैन असे त्या वकिलाचे नाव असून ते जबलपूर येथील रहिवासी आहेत. अरुण 11 मार्च 2002 रोजी जबलपुरमध्ये दिल्लीच्या हजरत निजामुद्दीनसाठी एका विशेष ट्रेनने प्रवास करत होते. ट्रेनची वेळ दुपारी 3.30 होती. त्यांना 12 मार्च रोजी सकाळी 4 वाजून 10 मिनीटात हजरत निजामुद्दीन येथे पोहोचायचे होते. मात्र ती ट्रेन जवळपास तीन तास उशीराने धावली. त्यामुळे अरुण यांचा पुढचा प्रवास चुकला. रेल्वे उशीरा धावल्याने त्यांचे नुकसान झाले. हे प्रकरण त्यांनी गंभीरतेने घेऊन अरुण कुमार जैन यांनी ग्राहक मंचाशी संपर्क साधला. जवळपास तीन वर्ष कायद्याची लढाई लढत त्यांना अखेर आता न्याय मिळाला आहे.

अरुण कुमार यांनी पुढचा प्रवास करण्यासाठी तीन तासांच्या अंतराने पुढचे तिकीट बुक केले होते. मात्र पहिली ट्रेन तीन तास उशिराने धावल्याने त्यांचे पूर्ण वेळापत्रक बिघडले. त्यांनी त्यासाठी रेल्वे विभागाला जबाबदार धरले. त्यानंतर याप्रकरणी रेल्वे विभागाने आपली बाजू मांडली मात्र त्यांना त्यांची ठोस बाजू मांडता आली नाही. तीन वर्षानंतर ग्राहक मंचाने रेल्वे विभागाला जबाबदार धरले. ग्राहक मंचाने रेल्वेवर 7 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याच्या तिकीट रिफंड़चे 803.60 रुपये, मानसिक त्रासासाठी 5 हजार रुपये आणि केसचत्या सुनावणीसाठी 2 हजार रुपये देण्याचा आदेश दिला. एवढेच नाही तर 45 दिवसांच्या आत दंडाची रक्कम वकिलाला देण्याचा आदेश रेल्वे विभागाला देण्यात आला.