नाशिकच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार; ‘आदिवासी विकास’कडून चौकशी समिती नियुक्त

आदिवासी विकास महामंडळाच्या सुरगाणा येथील गोदामातील भात (साळ) नाशिकऐवजी गुजरातमध्ये नेऊन तांदळाचा काळाबाजार केला जात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे.

आधारभूत किंमतीत धान खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी विकास महामंडळाने जिह्यातून 1 लाख 65 हजार 540 क्विंटल भात (साळ) खरेदी केली आहे. विविध ठिकाणी तो गोदामात साठविण्यात आला आहे. जिह्यातीलच मिलमध्ये भरडाई करून त्याचा तांदूळ जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात जमा करण्यासाठी तीन राईस मिलला कंत्राट देण्यात आले आहे. सुरगाण्याच्या गोदामातून हा भात भरडाईसाठी नाशिकच्या पांढुर्लीतील मिलमध्ये न नेता तो गुजरातमध्ये नेल्याचे चव्हाट्यावर आले आहे. भाताच्या पोत्याने भरलेल्या ट्रकचे सुरगाणा ते गुजरातचे व्हिडीओ चित्रीकरण आणि जिओ टॅगींगच्या फोटोचे पुरावे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. या काळाबाजार रॅकेटची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी ‘सामना’ला सांगितले.

बोगस रेकॉर्डसाठी पळापळ

भात काळाबाजाराचे वृत्त प्रसिद्ध होताच भ्रष्ट टोळीचे धाबे दणाणले आहे. गुजरातमध्ये भाताची विल्हेवाट लावणाऱ्या मिल कंत्राटदाराशी संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क साधला आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी चौकशी समिती नियुक्त केली असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतःच स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. पुरवठा खात्यातील अधिकारी व कंत्राटदाराशी संपर्क साधून सोयीचे खुलासे मागितले आहे.

व्यापाऱ्याचे ट्रक दाखवण्याचा प्रयत्न

या ट्रकमध्ये गोदामातील भाताचे पोते नव्हते, तर ते खासगी व्यापाऱ्याचे होते, असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदाराकडून सुरू आहे. सुरगाणा ते गुजरातमधील उनई व वासदा येथील व्हिडीओ चित्रीकरण आणि जिओ टॅगिंगच्या फोटोंचे पुरावे यामुळे ते ट्रक व्यापाऱ्याचे दाखविणे भ्रष्ट टोळीच्या अन् व्यापाऱ्याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.