
बुंदी लाडू प्रसाद विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पुरातत्व विभागाचे पत्र वादग्रस्त ठरले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात लाडू विक्री सुरूच ठेवण्यावर विश्वस्त मंडळ ठाम आहे. दुसरीकडे पोलिसांनीही कारवाई टाळल्याने पुरातत्वचे पत्र केराच्या टोपलीत गेले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाने गुढीपाडव्यापासून मंदिर आवारात बुंदी लाडू प्रसाद योजना सुरू केली आहे. तेव्हापासून वीस रुपयांत दोन लाडू भाविकांना दिले जात आहेत. याला आक्षेप घेत पुरातत्व खात्याकडे तक्रार करण्यात आली. योजना बंद करावी, अशी सूचना देऊनही ती सुरूच राहिली. यामुळे या विभागाने पुढचे पाऊल उचलले. संरक्षित स्थळाचा दर्जा असल्याने लाडू विक्री बेकायदेशीर आहे, याप्रकरणी विश्वस्तांवर गुन्हा दाखल करावा, असे पत्र संरक्षण सहाय्यकांनी सोमवारी, 5 मे रोजी त्र्यंबकेश्वर पोलिसांना दिले. वाद निर्माण होण्याच्या भीतीने पोलीस कारवाई टाळत आहेत.
पत्र मिळाले नाही – कडलग
पुरातत्व खात्याचे अद्याप कुठलेही पत्र मिळाले नाही, असे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. शिर्डी, बालाजीसह अनेक देवस्थानांमध्ये प्रसाद म्हणून लाडू विक्री केली जाते. ही योजना कायदेशीर असून, ती अखंडपणे सुरूच राहील, संपूर्ण विश्वस्त मंडळ यावर ठाम आहे, भाविकांचीही हीच इच्छा आहे, असेही कडलग यांनी स्पष्ट केले.