
मतदार फेरतपासणी प्रक्रियेतील घोळाची व निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची तक्रार करण्यासाठी गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाचा निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अपमान केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने आज केला. ‘पश्चिम बंगालमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भाजपशी संबंधित निवडणूक अधिकाऱयांची माहिती देताच ज्ञानेश कुमार भडकले आणि आम्हाला ‘गेट लॉस्ट’ म्हणाले,’ असे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सांगितले.
ज्ञानेश कुमार यांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओब्रायन यांनी या वेळी बैठकीतील घडामोडींची माहिती दिली. ‘‘सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटायला गेलो. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पत्र आम्ही त्यांना दिले. भाजपशी संबंधित निवडणूक अधिकाऱयांचे सहा दाखले आम्ही त्यांना दिले. असे अधिकारी नियुक्त करून तुम्ही निष्पक्षपाती निवडणुका कशा घेणार, असा सवाल त्यांना केला. त्यावर ते भडकले आणि ‘चालते व्हा’ म्हणाले. सातव्या मिनिटाला त्यांनी बैठक संपवली,’’ अशी माहिती डेरेक ओब्रायन यांनी दिली.
सहआयुक्तांना बोलूच दिले जात नाही!
‘‘ज्ञानेश कुमार हे त्यांच्या सहआयुक्तांना बोलूच देत नाहीत. आम्ही निवडणूक आयोगासोबत आतापर्यंत 8 ते 9 बैठका घेतल्या आहेत. प्रत्येक वेळी फक्त ज्ञानेश कुमार बोलतात. इतर कोणीच बोलत नाही. आज आम्ही त्यावर आक्षेप घेतला. इतरांना बोलू द्या असे आम्ही सांगितले. त्यामुळे ज्ञानेश कुमार संतापले आणि त्यांनी चर्चा गुंडाळली,’’ असे ओब्रायन यांनी सांगितले. ‘‘आजच्या बैठकीत जे काही घडले, त्याचा व्हिडिओ किंवा ऑडिओ जाहीर करा,’’ असे आव्हान डेरेक ओब्रायन यांनी निवडणूक आयोगाला दिले.
तृणमूल हा संसदेतील दुसऱया क्रमांकाचा मोठा विरोधी पक्ष आहे. घटनात्मक पदावरील अनेक अधिकाऱयांना आजवर भेटलोय. मात्र आज जे काही घडलं, ते लज्जास्पद होतं. – डेरेक ओब्रायन
- बैठकीनंतर पश्चिम बंगालमधील निवडणुका भयमुक्त, हिंसाचारमुक्त, प्रलोभनमुक्त असतील, अशी पोस्ट आयोगाने केली. त्यावर ही पोस्ट आयोगाची आहे की भाजपची, असा प्रश्न सोशल मीडियात विचारला जात आहे.































































