तिसऱ्या आघाडीच्या सरकारसाठी पाठिंबा, पण राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नाही!

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तशीच वेळ आली तर केंद्रात तिसऱ्या आघाडीच्या सरकारसाठी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पाठिंबा देईल पण सरकारचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देण्यास मात्र आम्ही मान्यता देणार नाही. काँग्रेसने या आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा असा टोला तेलंगणाचे मुख्यमंत्री टी. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने राहुल यांना पंतप्रधानपदाच्या तख्तावर बसविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसला लगावला.

केंद्रात बिगरकाँग्रेसी आणि बिगरभाजप सरकार आणण्यासाठी टीआरएस प्रमुख राव यांनी कंबर कसली आहे. त्यासाठीच त्यांनी डीएमके प्रमुख स्टॅलिन आणि तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांचीही भेट नुकतीच घेतली होती. टीआरएसचे प्रवक्ते रसूल खान यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना राहुल यांच्या नेतृत्वात सरकार बनवणे टीआरएसला मान्य नसेल असे बजावत काँग्रेसला जोरदार चिमटाच काढला आहे.

काँग्रेस 100चा आकडाही पार करू शकणार नाही!
या लोकसभा निवडणुकीत टीआरएस, वायएसआर, सपा -बसपा आणि डीएमके, तृणमूल हे पक्ष लक्षणीय यश मिळवतील पण काँग्रेस 100 चा आकडाही पार करू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसने तिसऱ्या आघाडीच्या सरकारसाठी बाहेरून पाठिंबा द्यावा, असेही टीआरएस नेते रसूल खान यांनी काँग्रेसला सुचवले. टीआरएस केंद्रात अथवा राज्यात भाजपला पाठिंबा देणार नाही अथवा त्यांचा पाठिंबा घेणार नाही, असेही खान म्हणाले.