
अमेरिकेत बाहेरून आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर थेट 200 टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प सरकारने आणला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास जेनेरिक औषधांचा व काही औषधांतील प्रमुख घटकांचा मोठा निर्यातदार असलेल्या हिंदुस्थानला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोविड महामारीच्या काळात अमेरिकेत औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारला आयातीवर अवलंबून राहावे लागले होते. तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये या दृष्टीने हा प्रस्ताव आणल्याचे अमेरिका सरकारचे म्हणणे आहे. स्थानिक औषध निर्मितीला चालना देण्याचाही उद्देश यामागे आहे.
फायदा कमी, तोटा जास्त?
अमेरिकेतील एकूण औषध आयातीत हिंदुस्थानचा वाटा सुमारे 6 टक्के आहे. हा वाटा तुलनेने कमी असला तरी हिंदुस्थानातून निर्यात होणाऱया औषधी घटकांचा महत्त्वाच्या औषधांमध्ये वापर होतो. शिवाय, जेनेरिक औषधांवर अमेरिकेत आयात शुल्क नाही. आता त्यावर टॅरिफ लागल्यास अमेरिकेत औषधे महाग होणार आहेत. त्यामुळे ट्रम्प सरकारचा हा निर्णय उलटणार असून अमेरिकेला फायदा कमी, तोटा जास्त होण्याची शक्यता आहे.