
अमेरिकेत जन्म घेतलेल्या नवजात बाळांना ट्रम्प सरकार बक्षीस देणार आहे. नवजात मुलांना 1 हजार डॉलर म्हणजेच 92 हजार रुपये देणार आहे. ही रक्कम मुलाच्या नावाने उघडल्या जाणाऱ्या एका विशेष खात्यात जमा केली जाणार आहे. ही योजना गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केली होती. आता या योजनेला अमेरिकेतील मोठय़ा कंपन्यांचा पाठिंबा मिळू लागला आहे. या योजनेला ‘ट्रम्प अकाऊंट’ असे म्हटले जाते.
‘व्हाईट हाऊस’ने दिलेल्या माहितीनुसार, हे पैसे करमुक्त असतील. सरकार मुलांच्या भविष्यासाठी बचत खात्यात ही रक्कम जमा करेल. या खात्यात जमा केलेली रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाईल, जेणेकरून वेळेनुसार ती वाढू शकेल. या योजनेचा लाभ 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2028 दरम्यान अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना मिळणार आहे, असे ‘व्हाईट हाऊस’कडून सांगण्यात आले आहे. ही योजना अनेक कंपन्यांना पसंत पडली आहे. त्यामुळे बँक ऑफ अमेरिका आणि जेपी मॉर्गन चेस यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्याचे ठरवले आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या ट्रम्प अकाऊंटमध्ये सरकारप्रमाणेच हेसुद्धा 1 हजार डॉलरची रक्कम खात्यात जमा करणार आहेत. जेपी मॉर्गन चेसचे सीईओ जेमी डायमन म्हणाले की, त्यांची कंपनी दीर्घकाळापासून आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षेसाठी काम करत आहे. या योगदानामुळे कर्मचाऱ्यांना लवकर बचत सुरू करण्यास आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याची योजना आखण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
























































