
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी अलास्कामध्ये बैठक झाली. तीन तास बैठकीनंतरही युक्रेनप्रश्नी काहीच तोडगा निघाला नाही.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की “करार होईपर्यंत कोणताही करार नाही”, म्हणजे बैठकीत ठोस तोडगा निघाला नाही. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ही चर्चा यशस्वी ठरल्याचे सांगितले. आपण रशिया युक्रेनमधील संघर्ष संपविण्यात “प्रामाणिकपणे इच्छुक” आहे, परंतु त्याचबरोबर काही “कायदेशीर चिंता” लक्षात घेणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया पुतीन यांनी दिली.
तीन तासांच्या चर्चेनंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आपली मते व्यक्त केली. या युद्धात आतापर्यंत हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि रशिया अजूनही माघार घेण्यास तयार नाही.या दोघांनीही पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत.
परिषदेत ट्रम्प म्हणाले की ही बैठक अत्यंत फलदायी झाली आणि अनेक मुद्द्यांवर एकमत झाले. फक्त काहीच मुद्दे उरले आहेत,” तसेच आपण अजून पूर्ण तोडगा काढलेला नाही, पण तोडगा लवरकच काढला जाईल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पुतीन म्हणाले की, चर्चा रचनात्मक आणि परस्पर सन्मानाच्या वातावरणात झाली. “ही चर्चा अत्यंत सखोल आणि उपयुक्त होती. आम्ही ज्या पातळीवर समजूतदारपणा गाठला आहे, त्यातून युक्रेनमध्ये शांततेचा मार्ग मोकळा होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. पण युक्रेनकडून रशियाला धोका आहे असेही पुतीन म्हणाले.
युक्रेनला नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सामील होण्याची महत्त्वाकांक्षा सोडून द्यावी अशी मागणी पुतीन यांनी केली होती. तसेच पूर्वेकडील त्या प्रदेशांचा त्याग करावा ज्यांना रशियाने आपल्यात विलीन केल्याचा दावा केला आहे. मात्र युक्रेनने ही मागणी फेटाळून लावली असून कोणत्याही शांतता करारामध्ये भविष्यातील रशियन हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा हमी असणे आवश्यक आहे, अशी मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की पुतिन यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे, परंतु ही मैत्रीपूर्ण बैठक युक्रेन युद्धावर नेमका कसा परिणाम करेल, याबद्दल कुठलीही माहिती देण्यास नकार दिला.