
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित ‘केनेडी सेंटर’ (Kennedy Center) कला केंद्र दोन वर्षांसाठी बंद करण्याची घोषणा केली आहे. येत्या जुलै महिन्यापासून या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू होणार असून, या निर्णयामुळे अमेरिकेच्या सांस्कृतिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देताना सांगितले की, हे केंद्र सध्या जीर्ण अवस्थेत असून आर्थिक आणि संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाले आहे. ‘तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, या केंद्राला जागतिक दर्जाचे कला आणि संगीताचे केंद्र बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे’, असे ट्रम्प यांनी नमूद केले. मात्र, ही इमारत खरोखरच पडझड झाली आहे का, याचे कोणतेही पुरावे अद्याप देण्यात आलेले नाहीत.
ट्रम्प यांनी या केंद्राचे नाव बदलून स्वतःचे नाव तिथे लावल्यापासून अनेक मोठ्या कलाकारांनी आणि संस्थांनी येथून माघार घेतली आहे.
प्रसिद्ध संगीतकार फिलिप ग्लास यांनी त्यांचे ‘सिंफनी नंबर १५’ सादरीकरण रद्द केले आहे. केंद्राची सध्याची मूल्ये त्यांच्या कलेशी विसंगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन नॅशनल ऑपेराने देखील या केंद्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
नवनियुक्त कलात्मक प्रोग्रामिंग प्रमुखांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत राजीनामा दिला आहे.
‘केनेडी’ कुटुंबाचा संताप
१९६४ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या स्मरणार्थ हे केंद्र उभारण्यात आले होते. ट्रम्प यांनी या इमारतीवर स्वतःचे नाव लावल्याने केनेडी कुटुंबीय संतापले आहेत. जॉन एफ. केनेडी यांची पुतणी केरी केनेडी यांनी आक्रमक पवित्रा घेत, ‘ट्रम्प यांचा कार्यकाळ संपताच मी स्वतः कुर्हाड घेऊन त्यांचे नाव तिथून हटवेन’, असे विधान केले आहे.
दुसऱ्या कार्यकाळातील मोठ्या बदलांचा धडाका
आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प वॉशिंग्टनमधील अनेक ऐतिहासिक वास्तूंमध्ये बदल करत आहेत. व्हाईट हाऊसचा ‘इस्ट विंग’ पाडणे, ४०० दशलक्ष डॉलर्सचा बॉलरूम प्रकल्प, डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लिंकन मेमोरियल जवळील ‘ट्रायम्फ आर्कि’ अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा यात समावेश आहे.
केनेडी सेंटरच्या ट्रस्टी बोर्डाचे अध्यक्ष स्वतः डोनाल्ड ट्रम्प असून, त्यांनी नियुक्त केलेल्या सहकाऱ्यांच्या संमतीनंतर या दोन वर्षांच्या बंदीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
trump to close washington’s kennedy center for 2 years for renovation
president donald trump announces a two-year closure of the kennedy center for renovation starting july, amid protests from artists and the kennedy family.
























































