हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; टॅरिफ बॉम्ब टाकल्यानंतर ट्रम्प यांच्याकडून दाव्याचा पुनरुच्चार

संसदेत पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध कोणत्याही देशाच्या मध्यस्तीने थांबवण्यात आले नाही, असे सांगितले. मात्र, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. तसेच मोदी यांचे मित्र असलेल्या ट्रम्प यांनी हिंदुस्थानवरही टॅरिफ बॉम्ब टाकत 25 टक्के टॅरिफ लावला आहे. तसेच पेनल्टीही लावली आहे. त्यानंतर त्यांनी हिंदुस्थान पाकिस्तान युद्ध आपणच थांबवल्याचा दाव्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे मोदी यांनी संसदेत थेट ट्रम्प यांचे नाव घेत त्यांना चांगलेच खडसवण्याची गरज होती, अशी चर्चा होत आहे.

हिंदुस्थान- पाकिस्तान यांच्यातील युद्ध व्यापाराने मिटवल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर आपण हिंदुस्थान-पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी अनेकदा हे युद्ध आपणच थांबवल्याचा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पुन्हा एकदा जगभरातील अनेक संघर्ष आणि युद्ध थांबवण्याचे श्रेय घेतले आहे. त्यात हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या युद्धाचाही समावेश आहे. हे युद्ध थांबवल्याचा दावा आतापर्यंत त्यांनी 30 वेळा केला आहे.

ट्रम्प यांचा हा दावा व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संघर्षासह जगभरातील अनेक संघर्ष थांबवल्याबद्दल ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात यावा असे म्हटल्यानंतर काही दिवसांनी आला आहे. काँगो प्रजासत्ताक आणि रवांडा यांच्यातील 31 वर्षांच्या रक्तपातासह 5 युद्धे संपवणे, हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवणे, इराणच्या अणु क्षमता नष्ट करणे यासारखी महत्त्वाची कामं आपण केली आहेत. ट्रम्प यांनी न्यूजमॅक्सवरील मुलाखतीत म्हटले होते की त्यांनी बरीच युद्धे मिटवली आहेत.

गेल्या काही काळात काय घडले ते तुम्ही पहा. आपण बरीच युद्धे मिटवली आहेत. त्यापेकी हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यातील संभाव्य अणुयुद्धही आपणच थांबवले आहे. थायलंड आणि कंबोडिया तसेच काँगो आणि रवांडा यांच्यातील संघर्षही आपणच मिटवला आहे. मी बरीच युद्धे मिटवली. मला वाटते की मी महिन्याला सरासरी एक युद्ध मिटवले. यातून आपण लाखो लोकांचे जीव वाचवत आहोत. आपण व्यापारातून अनेक युद्धे मिटवल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी अण्वस्त्रधारी दक्षिण आशियाई शेजाऱ्यांना सांगितले की जर त्यांनी संघर्ष थांबवला तर अमेरिका त्यांच्याशी व्यापार वाढवणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सांगितले की, जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास कोणत्याही देशाच्या नेत्याने सांगितले नाही. कोणाच्याही सांगण्यावरून हे युद्ध थांबवण्यात आले नाही. त्यांनतर आपणच हे युद्ध थांबवल्याच्या दाव्याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केल्याने याबाबत चर्चा होत आहेत.