
अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता पाचव्या आठवड्यात पोहोचले असून तणाव शिगेला पोहोचला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देश आमनेसामने आले आहेत. या संघर्षात इराणने प्रत्युत्तर म्हणून जगातील २० टक्के तेलाची वाहतूक होणाऱ्या होर्मुझची सामुद्रधुनी हा सागरी मार्ग बंद केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत आक्रमक आणि टोकाचा इशारा दिला आहे.
ट्रम्प यांनी इराणला होर्मुजचा मार्ग उघडण्यासाठी दिलेला १० दिवसांचा अल्टीमेटम आता संपत आला आहे. जर इराणने हा मार्ग खुला केला नाही, तर तेहरानमध्ये मोठा हल्ला घडवून आणला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मंगळवारचा उल्लेख ‘पावर प्लांट डे’ आणि ‘ब्रिज डे’ असा केला आहे. याचा अर्थ, मंगळवारी इराणमधील वीज प्रकल्प आणि महत्त्वाचे पूल अमेरिकेच्या निशाण्यावर असतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
Truth Social वर केलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “इराणमध्ये मंगळवारी पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे, एकाच वेळी साजरे केले जातील. यापूर्वी असे कधीही घडले नसेल.होर्मुझची सामुद्रधुनी उघडा नाहीतर, तुम्ही नरकात जाल. फक्त बघा. अल्लाहला प्रार्थना करा.” दरम्यान, ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष मंगळवारच्या घडामोडींकडे लागले आहे.


























































