
अविश्वसनीय धाडस आणि जिद्दीमुळे अशक्य वाटणाऱया आव्हानांना सामोरे जात यश संपादन करणे, ही काल्पनिक वाटणारी कथा आपल्याला खऱया आयुष्यातही कधीतरी ऐकायला मिळते. प्रतीक शेलार यांचे ‘द आंत्रप्रेन्युअर’ हे त्याचे एक उदाहरण. तुळजापूरच्या एका खेडेगावातील मुलगा ते लंडनकरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एक हिंदुस्थानी उद्योजक. त्यांचा हा संघर्षमयी प्रवास ‘द आंत्रप्रेन्युअर’ या डॉक्युमेंटरीमध्ये ‘युटय़ूब’वर सात भागांत उपलब्ध आहे.
तुळजापूरला मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्रतीक यांना लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्राची आवड होती. त्यांची ही आवड एक उद्योजक म्हणून त्यांच्या भविष्याचा मार्ग मोकळा करेल, हे कुणाच्याही ध्यानीमनीही नव्हते. प्रतीक यांच्या उच्च शिक्षणासाठी वडिलांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथे गेल्यावर प्रतीक अभिनय, नाटय़क्षेत्राशी जोडले गेले. 2007 मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतानाच प्रतीक यांना ‘हमने जीना सिख लिया’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. कौटुंबिक दबावामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. इंडस्ट्रीत ‘बॅक-डोअर एंट्री’ घेत प्रतीक यांनी एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये मार्केटिंग हेड म्हणून काम करण्याचे ठरवले आणि अशा प्रकारे त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए करण्याचा निर्णय घेत, 2011 पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. प्रतीकने टॉप 3 मध्ये येऊन थेट कॉव्हेन्टरी युनिव्हर्सिटी, इंग्लंड गाठले. परदेशात टिकून राहणे तसे अवघड. नव्याने सादर केलेली व्हिसा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी, पदवीधर उद्योजक व्हिसा मिळवण्यासाठी प्रतीकने कठोर परिश्रम घेतले.
इंडियन मुव्ही फ्रेंडची सुरुवात…
प्रतीक यांची मेहनत फळाला आली आणि 2014 मध्ये ‘इंडियन मुव्ही फ्रेंड’ या त्याच्या पहिल्या व्यावसायिक उपक्रमाचा जन्म झाला. या तिकीट पोर्टलवरून मुव्ही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रूपांतरित करण्याचे ठरवले व महेश मांजरेकरांच्या ‘ध्यानीमनी’ हा हिंदुस्थानासह देशविदेशात ‘इंडियन मुव्ही फ्रेंड’द्वारे डिजिटली प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा ठरला. 2018 मध्ये नवीन उपक्रम ‘गोविडो’ जन्माला आला. मुख्य धारेतील हॉलीवूड आणि ब्रिटिश सिनेमा चित्रपटांसाठी एक गुंतवणूक व्यासपीठ.
2022 पर्यंत गोविडो प्लॅटफॉर्मवरून ऑस्कर, बाफ्टा अशा नामांकित पुरस्कारप्राप्त निर्मात्यांच्या 12 सिनेमांमध्ये तब्बल 15 करोड रुपयांची गुंतवणूक गेलेली आहे. त्यांनी ‘इंडियन मुव्ही फ्रेंड’चे पुनरुज्जीवन केले आहे आणि फ्रान्समधील जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी आमंत्रण मिळाले, जिथे त्यांनी आपले आगामी उपक्रम जगासमोर मांडले. प्रतीक यांच्या जिद्दीची कहाणी असलेला ‘द आंत्रप्रेन्युअर’ हा माहितीपट गोविडो ‘युटय़ूब’वर उपलब्ध असून लवकरच तो मुख्य प्रवाहातील हॉलीवूड सिनेमा बनत आहे.
इच्छाशक्ती असेल तर अनेक आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे आपसूकच येते. फक्त आपल्याकडे थोडा संयम आणि मेहनतीची तयारी हवी, हेच सांगण्याचा प्रयत्न मी ‘द आंत्रप्रेन्युअर’ या माहितीपटातून केला आहे.