प्रसाद, क्षितिजची विक्रमी बाईक राइड,‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश

52


सामना ऑनलाईन, अलिबाग

रायगड जिह्यातील मुरुड जंजिरा येथील प्रसाद चौलकर आणि दिवेआगर येथील क्षितिज विचारे या दोन क्रीडापटूंनी तब्बल 72 तासांत ठाणे ते काठमांडू नेपाळ अशी साहसी बाईक सफर करून नवा विक्रम घडवला. हा विक्रम साकारताना त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश भेट दिलेल्या भागांतील नागरिकांना दिला.

यंदाच्या 26 मे रोजी ठाणे येथून चौलकर आणि विचारे या युवकांनी साहसी बाईक सफर सुरू केली होती. पुढे नाशिक, धुळे, इंदूर, झाशी, कानपूर, लखनौवरून गोरखपूरमार्गे ते 29 मे रोजी पहाटे नेपाळमधील काठमांडू येथे पोहचले. काठमांडू येथे पोहचल्यानंतर एवढय़ावरच न थांबता त्यांनी पुढे दार्जिंलिंग गाठले. पश्चिम बंगालमधील गावातून बाईकस्वारी करीत त्यांनी भूतान देशातील पारो, थिंपू इत्यादी शहरांना भेट दिली. 1 जून रोजी नेपाळमधून प्रवास सुरू केला आणि हिंदुस्थानातील पश्चिम बंगालवरून त्याच दिवशी भूतान देशातील फुंशोलिंग येथे थांबवला म्हणजेच एकाच दिवशी तीन देशांत बाईक राइड करण्याचा विक्रमदेखील यांना साधता आला.

प्रसाद हा आंतरराष्ट्रीय कराटेपटू असून त्याने देशासाठी आणि राज्यासाठी अनेक पदके जिंकली आहेत तसेच पत्नी प्रियांका हिच्यासह याआधी हिंदुस्थानातील अनेक राज्यात बाईक राइड केली आहे. क्षितिज विचारे हा एक सायकलिस्ट असून त्याने देशभर सायकल भ्रमंती करून भूतान, नेपाळ तसेच माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत सायकल घेऊन जाण्याचा विक्रम केला आहे. क्षितिज येत्या 15 ऑगस्ट रोजी मुंबई ते फ्रान्स अशी 75 देशांत सायकलस्वारी करण्यासदेखील सज्ज झाला आहे.

8 राज्ये, 3 देश केले पादाक्रांत

विविध संकटांवर मात करीत जिद्दीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड अशी एकूण आठ राज्ये आणि हिंदुस्थान, नेपाळ, भूतान अशा तीन देशांतून एकूण 6100 किलोमीटरचा प्रवास 15 दिवसांत या दोघांनी पूर्ण केला. प्रवासादरम्यान विविध मोटरसायकल क्लबचे सहकार्य लाभले. बऱयाच मित्रांची मदत मिळाली त्या सर्वांचे या दोघांनी आभार मानले आणि देशाच्या कानाकोपऱयात बाईक भ्रमंती करतानाच सामाजिक संदेश देत राहू. या राइडमध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा संदेश देत सामाजिक जाणीव जपत राहू असे मत व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या