अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात बनावट नियुक्तीचे पत्र देऊन दोघांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे त्या रुग्णालयात काम करतात. जुलै महिन्यात एकजण त्याच्याकडे आला. त्याने रुग्णालयातील बिलिंग विभागाचे नियुक्ती पत्र दाखवले. तेव्हा तक्रारदार याने ते पत्र कोणी दिले अशी त्याला विचारणा केली. ते पत्र एका महिला डॉक्टरने दिल्याचे त्याने तक्रारदार याना सांगितले. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने तरुणाला फोन करून त्या नियुक्ती पत्राबाबत विचारणा केली. रुग्णालयात एचआर विभागात काम करणाऱ्या एक महिलेने ते पत्र दिल्याचे त्याने त्या महिलेला सांगितले. तसेच त्या महिलेने त्याच्याकडून वीस हजार रुपयेदेखील घेतले होते. तो तरुण नोकरीबाबत वारंवार विचारणा करत असल्याने त्या महिलेने त्याचे पैसे परतदेखील केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने रुग्णालय प्रशासनानेदेखील चौकशी केली. त्या नावाची महिला तेथे काम करत नसल्याचे लक्षात आले. त्या तरुणाला बनावट नियुक्तीचे पत्र दिल्याचे तपासात समोर आले.