मध्य प्रदेशात रेल्वे दुर्घटना, समर स्पेशल ट्रेनचे दोन डबे रुळावरुन घसरले

रेल्वे दुर्घटनांचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. यूपीतील मालगाडी दुर्घटनेनंतर आज मध्य प्रदेशात रेल्वे दुर्घटना घडली आहे. इटारसी रेल्वे जंक्शनवर सोमवारी सायंकाळी हा रेल्वे अपघात झाला. म्हैसूर राणी कमलापती सहरसा स्पेशल ट्रेन रुळावरून घसरली. ट्रेन प्लॅटफॉर्मजवळ येत असतानाच हा अपघात झाला. ट्रेनचे दोन डबे रुळावरुन घसरले आहेत. मोठ्या आवाज होऊन ट्रेन अचानक थांबली. ट्रेन थांबताच घाबरलेल्या प्रवाशांनी रेल्वेतून बाहेर उड्या घेतल्या.

राणी कमलापती, इटारसी मार्गे म्हैसूरहून सहरसाकडे ही विशेष ट्रेन चालली होती. इटारसी रेल्वे स्थानकाजवळ येत असतानाच सायंकाळी 6.30 वाजता हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रुळावरून घसरलेले दोन्ही डबे रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सध्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे.