
ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान यांनी केलेल्या विधानावरून प्रसार माध्यमांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना बापाचा बचाव करण्यासाठी एआर रहमान यांच्या दोन मुली सरसावल्या आहेत. खतीजा रहमान आणि रहीमा रहमान या दोघींनीही आपल्या बापाची बाजू मांडली आहे. या दोघींनीही मल्याळम संगीतकार कैलास मेनन यांची पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली असून ज्यात रहमान यांच्या विधानावर संयम आणि आदर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खतीजा रहमानने कैलास मेनन यांच्या पोस्टवर टाळी, फायर आणि हृदयाचे इमोजी पोस्ट करून कमेंटही केली आहे. एआर रहमानला पाठिंबा देण्यासाठी संगीतकार कैलास मेनन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये म्हटले की, जे लोक एआर रहमानला आपले मत स्पष्टपणे मांडल्याबद्दल दोषी ठरवत आहेत, ते एका मूलभूत गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी आपल्या मनातील गोष्ट सांगितली. हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही त्यांच्याशी असहमत असू शकता, पण तुम्ही त्यांना त्यांचे अनुभव व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित करू शकत नाही, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

























































