छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून IED स्फोट; दोन जवान शहीद, चार जखमी

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IED च्या स्फोटात दोन जवान शहीद झाले आहेत. तर चार जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी जखमी जवानांना रायपूर येथे नेण्याची तयारी सुरु आहे. नक्षलविरोधी मोहिमेहून परतत असतानाच ताररेम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडीमार्काच्या जंगलात काल रात्री हा पाईप स्फोट झाला.

दरभा विभाग, पश्चिम बस्तर विभाग आणि विजापूर, दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांमधील सीमावर्ती भागात नक्षलवादी घुसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे STF, जिल्हा राखीव गट (DRG), कमांडो बटालियन यांच्या संयुक्त पथकांनी रिझोल्युट ॲक्शन (CoBRA) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मंगळवारी विशेष मोहिमेवर तैनात करण्यात आले होते.

मोहिम संपवून बुधवारी रात्री जवान परतत असतानाच नक्षलवाद्यांनी हा IED स्फोट घडवून आणला. राज्य टास्क फोर्सचे चीफ कॉन्स्टेबल भरतलाल साहू आणि कॉन्स्टेबल सतेरसिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत. तर पुरुषोत्तम नाग, कोमल यादव, सियाराम सोरी आणि संजय कुमार अशी जखमी जवानांची नावे आहेत.

सध्या या भागात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले असून, जखमी एसटीएफ जवानांवर योग्य उपचार करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.