‘तोयबा’च्या दोघा दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने पुन्हा मोठय़ा प्रमाणात घुसखोरीचा डाव आखला आहे. मात्र, हिंदुस्थानने हा डाव हाणून पाडला. हिंदुस्थानात घुसखोरी करताना ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोघा दहशतवाद्यांना हिंदुस्थानने अटक केली आहे. हे दोनही दहशतवादी पाकिस्तानचे नागरिक आहेत.

चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लोन यांनी याबाबत माहिती दिली. ‘कश्मीरमधून 370 कलम रद्द केल्यामुळे खोऱ्यात शांती निर्माण झाली आहे. मात्र, ही शांती पाकिस्तानला बघवत नाही. त्यामुळे घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया करून खोऱ्यात पुन्हा अशांती निर्माण करण्याचा पाकिस्तानचा कट आहे.’

दहशतवादी पाकिस्तानी

अटक करण्यात आलेले दहशतवाद्यापैकी एक दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या गाजी आबाद शहरातील आहे तर दुसरा रावळपिंडीतील आहे. एकाने तर आपल्या साथीदारांची नावेही सांगितली. ‘लष्कर-ए-तोयबा’साठी आम्ही काम करत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

चकमक, हिंसाचार आणि त्यात होणाऱ्या मृत्यूला लष्कर जबाबदार नाही, असे ढिल्लो म्हणाले. ‘कश्मिरी लोकांच्या चांगल्या भविष्याची मी कामना करतो. मुलांना ड्रग्स आणि शस्त्रास्त्रs, हिंसाचारापासून लांब राहावे. आपल्या देशाचा, पालक आणि गुरुजनांचा मानसन्मान वाढेल, असे काम करावे, असा सल्ला ढिल्लोन यांनी तरुणांना दिला.