
मेट्रोच्या आणखी दोन मार्गिका येत्या शुक्रवारपासून प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत. मेट्रो 2ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा पहिला टप्पा तसेच मेट्रो 9अ मार्गिकेतील दहिसर ते काशीगावपर्यंतच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरांतील रस्त्यांवरील वाहतूककोंडीपासून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
मुंबई शहरात सध्या चार मेट्रो मार्गिका प्रवासी सेवेत आहेत. त्यात शुक्रवारपासून दोन नव्या मेट्रो मार्गिकांची भर पडणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात एमएमआरडीएमार्फत 14 मेट्रो मार्गिकांच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. मुंबईत वाहतूककोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर मेट्रोची कामे जलदगतीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे. मेट्रो 2ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले आणि मेट्रो 9अ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव या दोन टप्प्यांतील कामे पूर्ण होऊन काही महिने उलटले. दोन्ही टप्प्यांच्या उद्घाटनाची प्रतीक्षा होती.

























































