शिवसेनेच्या महामेळाव्यात सांगलीत दोन हजार तरुणांना नोकरी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक बजरंग पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘नोकरी महामेळाव्या’ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास सात हजार इच्छुकांनी महामेळाव्याला हजेरी लावली, तर दोन हजार युवकांना विविध कंपन्यांत विविध पदांवर नियुक्ती मिळाली आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक बजरंग पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सांगली जिल्हा संघटक बजरंग पाटील यांनी येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये जिह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी भव्य नोकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने युवक उपस्थित होते. तर, राज्यभरातून अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

मेळाव्याच्या उद्घाटन समारंभास हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचे संचालक दीपकबाबा शिंदे, वालचंद कॉलेजचे प्राचार्य उदय दबडे, उद्योगपती श्रीनिवास पाटील, रमेश आरवाडे, भाजपनेत्या नीता केळकर, शेखर इनामदार, हर्षवर्धन पाटील, राऊजी गोसावी, शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या संघटिका मनीषा पाटील, शहरप्रमुख विराज बुटाले, समृद्धी इंडस्ट्रीजचे रमाकांत मालू, सांगली-मिरज-कुपवाड चेंबर ऑफ कॉमर्सचे सतीश मालू, तुकाराम बाबा बागडे महाराज उपस्थित होते.

बजरंग पाटील म्हणाले, दोन हजारपेक्षा जास्त तरुणांच्या जीवनाची कारकीर्द सुरू झाली. एकही रुपयाचा खर्च न करता अथवा प्रवास न करता सांगलीसारख्या शहरात हजारो तरुणांना एकाचवेळी नोकरी मिळवून देण्याचे काम या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केले आहे. पुणे, बंगळुरूसारख्या शहरांत जितक्या पगाराचे पॅकेज मिळते, त्याच्या तोडीसतोड सांगलीतही मिळू शकते, हे आम्ही सिद्ध केले. तसेच प्रत्येक वर्षी नोकरी महामेळावा घेऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दोन ते सात लाखांपर्यंतचे मिळाले पॅकेज

या मेळाव्यासाठी ऍक्सिस बँक, रिलायन्स निऑन, अव्हिवा इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, हिंदुस्थान लायन्स, बालाजी ऑटो, टेकबुक्स, आशीष मोटर्स, जयसन्स फाऊंड्री, महाबळ फाऊंड्री, धनप्रकाश इंडस्ट्री, क्रेव्हिश इंडस्ट्री यांसह अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कंपनी प्रतिनिधींनी मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करत त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. दोन लाखांपासून साडेसात लाखांपर्यंतचे पॅकेज या युवकांना मिळाले आहे. ‘क्यूजेपीआर ग्रुप’चे मारुती गायकवाड व पवनकुमार मालू यांच्या सहकार्याने हा मेळावा यशस्वी करण्यात आला, असेही बजरंग पाटील यांनी सांगितले.