दोन चाकी टॅक्सी… तीन चाकी बाईक…पवई IITच्या विद्यार्थ्यांची डिझाईन्स पाहून दिल्लीकर अवाक्

823

ऐकून आश्चर्य वाटेल आणि पाहून कौतुक करावेसे वाटेल अशी नव्या पिढीतील वाहनांची डिझाईन्स पवई येथील आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहेत. परिस्थितीची मागणी आणि नव्या पिढीचा कल पाहून विद्यार्थ्यांनी बनवलेली ही डिझाईन्स नवी दिल्लीतील ‘ऑटो एक्स्पो 2020’ प्रदर्शनात ठेवली गेली आहेत. आयआटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली दोन चाकी टॅक्सी, व्हीलचेअर कार, आधुनिक तरुणांनाही शेती करावीसी वाटेल असा स्टायलिश ट्रक्टर आदी डिझाईन्स पाहून दिल्लीकरांनीही तोंडात बोटे घातली.

ऑटो एक्स्पो हे आशिया खंडातील सर्वात मोठे प्रदर्शन असते. यंदा ते दिल्लीच्या ग्रेटर नोएडा येथे भरले आहे. आयआयटी मुंबईतील इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरमधील (आयडीसी) दहा विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेली वाहनांची मॉडेल्स या प्रदर्शनात ठेवली गेली आहेत. विद्यमान जगताची गरज ओळखून आयडीसीचे विद्यार्थी आपल्या कल्पनेतून वेळोवेळी अशी डिझाईन्स बनवत असतात. ती या प्रदर्शनात ठेवण्यात येतात आणि त्यानिमित्त विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील तज्ञांशीही संवाद साधता येतो असे आयडीसीचे प्रमुख प्रा. फानी तेतली यांनी सांगितले. गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन या डिझाईन्सवर काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.

ट्रक इंटेरिअर

हिंदुस्थानी ट्रकचालकांचे जीवन कसे असते त्याचा अभ्यास करून रजत प्रकाश या विद्यार्थ्याने ट्रकमधील इंटेरियर कसे असावे त्याचे डिझाईन बनवले आहे. त्यासाठी त्याने ट्रकचालकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

व्हीलचेअर कार

व्हीलचेअरशिवाय ज्यांना हालचाल करता येत नाही अशा लोकांसाठी योगेश कुमार याने इलेक्ट्रिक व्हीलचेअर मायक्रोकारचे डिझाईन बनवले आहे. ही कार व्हीलचेअरवरील व्यक्ती कोणाच्याही सहकार्याशिवाय चालवू शकते. तसेच त्या कारचा वापर ते टॅक्सीसारखा व्यवसायासाठीही करू शकतात.

दोन चाकी टॅक्सी

अय्यप्पा केएस या विद्यार्थ्याने दोन चाकी टॅक्सी डिझाईन केली आहे. ती कॅब आणि रिक्षापेक्षाही परवडणारी असेल. सर्व वयोगटातील लोकांचे हवामानापासून संरक्षण करण्याची व्यवस्था या टॅक्सीमध्ये आहे. या टॅक्सीमुळे रोजगारही वाढू शकेल.

चार्टर याच

सम्यक खोब्रागडे या विद्यार्थ्याने मुंबईतील पर्यटकांना डोळ्यासमोर ठेवून ‘चार्टर याच’ म्हणजेच खासगी जहाज डिझाईन केले आहे. परदेशात अशी आलिशान याच भाडय़ाने देण्याच्या व्यवसायात कोटय़वधींची उलाढाल होते.

दंगल नियंत्रक वाहन

 दंगल आवाक्याबाहेर गेली तर सुरक्षा जवानांची सुरक्षाही या वाहनांमध्ये होऊ शकत नाही. याचा अभ्यास करून विशाल शर्मा या विद्यार्थ्याने दंगल नियंत्रक वाहन डिझाईन केले आहे. ते सुरक्षा जवानांना संपूर्ण सुरक्षा पुरवण्याबरोबरच आवश्यक सुविधांना सज्ज असेल.

आपली प्रतिक्रिया द्या