
चरवेली व पानवल येथील तीन तरुण मिऱ्याबंदर येथे मासेमारीसाठी गेले होते. त्यापैकी दोघेजण समुद्रात बुडाले होते. त्यातील एकाला वाचवण्यात यळ आले आहे. तर एक तरुण समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस व ग्रामस्थ शोध घेत आहेत. बुडालेल्या दुसऱ्या तरुणाला बेशुद्धावस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चिरवेली येथील राहुल राजेंद्र शिंदे (वय 24), दिगंबर अनंत गराटे (वय 20, दोघे रा. चरवेली, रत्नागिरी) व राहूल घवाळी (वय 24,रा. पानवल, रत्नागिरी) हे तिघे सोमवारी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या पाठीमागील खडपात मासेमारीसाठी गेले होते. त्यातील राहूल घवाळी मासे गरवत असताना अचानक आलेल्या लाटेत फसला आणि समुद्रात ओढला जाऊ लागला. त्यावेळी राहुल शिंदे याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाहात तो वाहून गेला. तसेच राहुलही पाण्यात ओढला गेला. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर मिऱ्या येथील काही ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्या राहूल घवाळीचा शोध सायंकाळी उशिरापर्यतसुरु होता.
या घटनेत बेशुद्धावस्थेत आलेला तरुण राहुल शिंदे याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सायंकाळी उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. मात्र वाहून गेलेल्या राहूल घवाळीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.