Latur News – महादेवाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, कारच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना कारने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. योगेश यशवंत जाधव आणि प्रेम दत्तात्रय मसुरे अशी मयत तरुणांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील दिग्रस-जांब दरम्यान ही दुर्घटना घडली.

जळकोट तालुक्यातील तरुका गावातील दोन तरुण श्रावणी सोमवारनिमित्त कंधार तालुक्यातील शंभू कडाचा महादेव या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन दोघेही मोटारसायकलवरुन आपल्या गावी परतत होते. राष्ट्रीय महामार्गावरील दिग्रसजवळ येताच नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील इर्टिगा कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला.

प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथे तरुणांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्यावर तिरुका येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तरुणांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. योगेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. तर प्रेमच्या पश्चात आई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.