ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये हरदीप जगज्जेता!

हिंदुस्थानच्या हरदीपने 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास घडविला. त्याने ग्रीको-रोमन प्रकारातील 110 किलो गटात सुवर्णपदक जिंकत जगज्जेतेपद पटकाविले. हरदीपने अंतिम फेरीत इराणच्या यजदान रजा डेलरूज याला अटीतटीच्या सामन्यात पराभूत केले.

आठव्या वर्षी पोरका झालेल्या 16 वर्षीय हरदीप हा आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर साऱयांच्या नजरेत भरला. हरदीपने ग्रीको-रोमन प्रकारात 110 किलो वजनी गटात 0-2 ने पिछाडीवर असतानाही इराणच्या यजदान डेलरूजला 3-2 ने पराभूत करून हिंदुस्थानसाठी ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. 17 वर्षांखालील गटात जगज्जेता होणारा तो पहिलाच हिंदुस्थानी कुस्तीपटू ठरला.

स्पर्धेच्या प्रारंभीच्या पात्रता फेरीत हरदीपने कझाकिस्तानच्या बाकतुर सोवेतखान याचा 2-0 असा पराभव केला. मग अंतिम 16 मध्ये त्याने पोलंडच्या माटेऊस यारोस्लाव टोमेल्का याच्यावर 4-2 गुणफरकाने विजय मिळवला. त्यानंतर उपांत्यपूर्व लढतीत युक्रेनच्या अनातोली नोवाचेंकोचा 9-0 असा धुव्वा उडवत हरपीतने उपांत्य फेरीत धडक दिली.