
>> उदय जोशी
यंदाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मराठवाडय़ातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतात चिखल आणि घरात पाणी हीच परिस्थिती मराठवाडय़ातील प्रत्येक गावामध्ये अनुभवायला मिळाली. पुरामध्ये केवळ शेतीच वाहून गेली नाही, तर संसार आणि स्वप्ने हेही वाहून गेले. उद्ध्वस्त झालेला मराठवाडा पुन्हा उभा राहिला पाहिजे. यासाठी नियम, अटी, शर्ती बाजूला ठेवून सरकारने पुढे आले पाहिजे हीच शेतकऱयाची आणि सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
कालपरवापर्यंत दुष्काळाच्या खाईत लोटलेला आणि कायम उन्हाने तळपणारा मराठवाडा आज पाण्यावर तरंगतोय. संभाजीनगरपासून धाराशिवपर्यंत आणि बीडपासून नांदेडपर्यंत गोदाकाठ फुगलाय. सिंदफणा खवळली, सिनाने तर दिशाच बदलली. जल, जमीन, जंगल जणू एक झाले. निसर्गाच्या या आपत्तीपुढे माणूस हतबल झाला आहे. अतिवृष्टीचे थैमान थांबेल, महापूरही ओसरेल. मात्र जे गमावलं ते पुन्हा मिळवण्यासाठी एक पिढी जाणार आहे. केवळ खरीप हंगामच गेला नाही, तर रब्बी हंगामही आता धोक्यात आला आहे. 50 लाख हेक्टर शेत जमीन उद्ध्वस्त झाली आहे.
मराठवाडा कायम अवर्षणग्रस्त राहिला आहे. जेमतेम तीन-चार एकर शेतीवर आपली उपजिविका भागवणारा मराठवाडय़ातील मोठा वर्ग दुष्काळाने विस्थापित केला. दरवर्षी मराठवाडय़ाने हजारो दुष्काळग्रस्त शेतकऱयांच्या आत्महत्या पाहिल्या. गावागावांत संसार उघडे पडले. लेकरंबाळं अनाथ झाली. ऊस तोडणीसाठी देशावर जाणाऱयांची संख्या वाढली. मात्र यावर्षी वेगळेच घडले. मे महिन्यात धुवांधार पाऊस झाला. शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या. घरात असलेलं सोन्याचं किडुकमिडुक मोडून शेतकऱयांनी मोठय़ा अपेक्षेने पेरणी केली. मराठवाडय़ात 60 लाख हेक्टरवर खरीप हंगाम बहरला. पण हाच हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने एका क्षणात हिरावून घेतला. मराठवाडय़ातील एका एका महसूल मंडळात पाच पाच वेळा अतिवृष्टी झाली. आठही जिह्यांमध्ये पावसाने सरासरीचा उच्चांक केला. अतिवृष्टीने आणि महापुराने सर्व काही हिरावून घेतले.
महापुराचा सर्वाधिक फटका धाराशिव, लातूर, बीड, जालना, परभणी, नांदेड जिह्यांना बसला. जमीन खरडून गेली. शेती वाहून गेली. एक हजार जनावरे मृत्युमुखी पडली. गावखेडय़ांतील सहा हजार रस्ते उद्ध्वस्त झाले. अनेक पूल पडले. शेकडो गावांचा संपर्क तुटला. कधी नव्हे ते सिना नदी रौद्ररूप धारण करून वाहू लागली. सिनाने पात्र बदलले. गोदावरी फुगली, तेरणा, मांजरा, रेणा, कयाधू, पंचगंगा, पूर्णा, मन्याड, लेंडी, बिंदुसरा, ंिसदफणा, सरस्वती, अमृता, वांजरा, एक नव्हे तर गावागावांतील शेकडो नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले. मराठवाडय़ातील सर्व धरणं खचाखच भरली. धरणांच्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होऊ लागला. नद्यांचे काठ वाट मिळेल तिकडे मार्ग काढू लागले. मराठवाडय़ाचा राज्याशी संपर्कच जणू तुटला अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
आव्हान आणि जबाबदारी
गोदावरी नदीमध्ये तीन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाला. सिंदफणा, तेरणा, मांजरा, बिंदुसरा, मन्याड, कयाथू, सिना या नद्यांनी केवळ खरीप हंगामच उद्ध्वस्त केला नाही, तर शेती वाहून नेली. आठ-आठ, दहöदहा फूट माती पाण्यामध्ये गायब झाली. लाखो हेक्टर सातबारावरील शेती अचानक भूगोलात दिसेनासी झाली. या दुर्घटनेमुळे एक पिढी बरबाद झाली. केवल आठ-दहा हजार हेक्टरी अनुदान देऊन सरकारची जबाबदारी संपणार नाही. मराठवाडा उभा करण्याची जबाबदारी सरकारला स्वीकारावी लागेल. जी माती वाहून धरणात गेली, ती माती परत आणावी लागणार आहे. शेती पुन्हा सजवावी लागणार आहे. संसार पुन्हा उभे करावे लागणार आहेत.
फळबागा नेस्तनाबूत
पारंपरिक पिकांना फाटा देत मराठवाडय़ातील शेतकऱयांनी अलीकडच्या काळात आधुनिक शेतीची पद्धत अमलात आणली. त्यातूनच फळबागा उभ्या राहिल्या. संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड या जिह्यांमध्ये फळबागांचे जाळे विणले गेले. बीडमधील मोसंबीचे हब म्हणून ओळखले जाणारे सिरसमार्ग उद्ध्वस्त झाले. तब्बल 500 हेक्टरवरील मोसंबी बाग पाण्यामध्ये तरंगत आहे. अशीच परिसिथती परभणी जिह्यातील केळी उत्पादकांची झाली. तर हिंगोली जिह्यातील हळद उत्पादकांची झाली. पावसाने जणू ठरवून मराठवाडय़ाचा कार्यक्रम केला. एवढे प्रचंड नुकसान मराठवाडय़ात झाले. एक फळबाग उभी करण्यासाठी त्या शेतकऱयाला सहा-सात वर्षे झिजावे लागते. गेल्या कित्येक वर्षांचे परिश्रम आणि पाहिलेले स्वप्न पुराच्या पाण्यात वाहून गेले.
लाखोंचे स्थलांतर अटळ
मराठवाडय़ात अल्पभूधारक शेतकऱयांची संख्या 75 टक्क्यांवर आहे. होती ती शेती उद्ध्वस्त झाली. मराठवाडय़ातील कोणत्याही जिह्यात ना उद्योग, ना धंदे, ना कारखानदारी. शेतात जाता येत नाही आणि हाताला काम नाही. उद्या काय खायचे याचे वांदे यातूनच आता गावागावांतून, जिह्याजिह्यांतून वेठबिगारांची संख्या वाढणार आहे. कामाच्या शोधात आणि कुटुंब जगविण्याच्या हेतूने गावखेडय़ातील लोकांना कामाच्या शोधात शहराचा रस्ता धरावा लागणार आहे. मराठवाडय़ातील लाखो कुटुंब विस्थापित होणार आहेत. या कुटुंबाचे स्थलांतर आता अटळ आहे.