
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाला आज पुन्हा धक्का दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांना न विचारता मुख्यमंत्र्यांनी दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अॅडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन या कंपनीबरोबर करार केला. त्यानुसार ही कंपनी मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये 1 हजार 740 कोटींची गुंतवणूक करणार आहे. आश्चर्य म्हणजे उदय सामंत यांच्या अपरोक्ष यासंदर्भात सामंजस्य करार झाला.
सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि एचएस ह्युसंग अॅडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली. कंपनीने ही गुंतवणूक नागपूरच्या बुटीबोरी येथे अॅडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादन क्षेत्रात केली असून यामुळे 400 स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्रात यापुढेही अनेक प्रकल्प गुंतवणुकीसाठी पुढे येत राहतील, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
ह्युसंग समूह ही दक्षिण कोरियन कंपनी असून टेक्सटाईल्स, केमिकल्स, अवजड उद्योग, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी कार्बन फायबर, अरामिड फायबर, टायर कॉर्ड, ऑटोमोटिव्ह सीट बेल्ट यार्न, हाय-स्ट्रेंथ इंडस्ट्रियल यार्न आणि फॅब्रिक्स यांच्या उत्पादनात आघाडीवर आहे.