Uddhav Thackeray : रशिया युक्रेनचं युद्ध थांबवणाऱ्या पप्पांनी बांगलादेशचं युद्ध थांबवावं, उद्धव ठाकरे यांचा टोला

बांगलादेशात अराजकता निर्माण झाली आहे. रशिया युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या पप्पांनी बांगलादेशचं युद्ध थांबवावं असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच मी अदानींच्या विरोधात नाही, पण कुणालीही मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही, जो मुंबईचा शत्रू तो आमचा शत्रू अशी रोखठोक भुमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

दिल्लीत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, जगभरात जनतेचा संयम सुटत चालला आहे. इस्रायलमध्येही लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. तिथल्या पंतप्रधानांना बाहेर पडता येत नव्हतं अशा बातम्या येत होत्या. आता बांगलादेशात अशी परिस्थिती निर्माण झाली. श्रीलंकेतही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते. तिच्या सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये. तसे केल्यास जनतेचे न्यायालय काय असतं हे बांगलादेशाच्या जनतेने दाखवून दिले आहे असे ठाकरे म्हणाले.

तसेच बांगलादेशात जर हिंदूंवर अत्याचार होत असतील तशा बातम्या खऱ्या असतील तर ताबडतोब अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात यावर चर्चा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याकडेही मणिपूर पेटलेलं आहे आणि कश्मीरमध्ये हिंदूंची हत्या होत आहे. बांगलादेशातही जर हिंदूवर अत्याचार होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदुंच रक्षण केलं पाहिजे. ही जबाबदारी पूर्णपणे केंद्र सरकारची आहे. कारण शेख हसीना यांना आश्रय देत असाल तर बांगलादेशातल्या हिंदुंचे रक्षण करणे ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

धारावी पुर्नविकास

मी धारावीच्या विकासाआड नाही, धारावीकरांना हे तिथल्या तिथं घर मिळालंच पाहिजे. धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवूनन मुंबईत एका धारावीच्या 20 धारावी करण्याचा डाव मिंधे सरकारकडून अदानींच्या माध्यमातून सुरू आहे ते आम्ही होऊ देणार नाही. कोणीही आले तर आम्ही मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही. धारावीत लोकांच्या घरी रोगजार आहे. प्रत्येकाचे काही ना काही तरी व्यवसाय आहे. या व्यवसायाची आणि रोजगाराबद्दल त्या प्रकल्पात काही तरतूद हवी. धारावीचा आराखडाच समोर आलेला नाही. मला भिती आहे की धारावीतल्या लोकांना ते मिठागरात फेकणार, दहिसर टोल नाका, मुलुंड टोलनाका, कुर्ला मदर डेअरी, अन्य वीस जागा या टेंडरमध्ये नव्हत्या. आणि अशी कोणतीही मुभा कंत्राटदारांना देण्यात आली नव्हती. तिथला टीडीआर काढला गेला आहे. टीडीआर वापरण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या गैर गोष्टी आहेत आणि कुठलीही गैर गोष्ट आम्ही होऊ देणार नाही. सरकार आल्यानंतरही टेंडरच्या बाहेरच्या गोष्टी होऊ देणार नाही. आणि त्या टेंडरच्या अटी तटींमुळे अदानींना जमत नसेल तर अदानींनी तसे सांगावे आणि नव्याने टेंडर काढावे. आतापर्यंत मिठागरांची जमीन वापरली जात नव्हती. आता अदानीला देत आहेत. अदानी माझे शत्रू नाही. पण जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावेल त्यांच्या मी विरोधात आहे. जो मुंबईचा शत्रू तो मुंबईकरांचा शत्रू.

विनेश फोगाट

विनेश फोगाटवर आम्हाला गर्व आहे. बांगलादेशात आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं. काहींना रझाकार म्हटलं होतं. शेतकऱ्यांनाही दहशतवादी म्हटलं होतं. विनेश फोगाट न्यायासाठी आंदोलन करत होती तर त्यांनाही दहशतवादी म्हटलं होतं. त्यामुळे बांगलादेशातली ही घटना हा इशारा आहे. देवाच्या वर कोणी नाही, आपण मनुष्य आहोत. मराठीत एक म्हण आहे दैव देतं आणि कर्म नेतं. हे प्रत्येकाचं कर्म असतं. देवानं दिलं आहे, आपण देवापेक्षा मोठं समजू नये हा त्यातलाच इशारा आहे.

पप्पांनी युद्ध थांबवावं

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतोय अशा बातम्या समोर येत आहे. जे मला औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणाले होते त्यांना विचारा. ते यावर काय करणार? यावर पंतप्रधानांची काय प्रतिक्रिया आहे. काल सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान होते का? संसदेत पंतप्रधानांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? ज्यांनी रशिया युक्रेनचं युद्ध थांबवलं त्या पप्पांनी हे युद्ध थांबवावं.

स्वाभिमानी महाराष्ट्र

लाडका भाऊ योजना ही नवीन योजना नाही. शिकाऊ विद्यार्थ्यांना वेतन देण्याची केंद्र सरकारची योजना आहे, त्यासाठी केंद्र सरकारकडून साडे आठ हजार रुपये मिळणार होते. एकीकडे शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाही. किती दिवस स्वाभिमानी महाराष्ट्राला केंद्र सरकारवर अवलंबून ठेवणार? महाराष्ट्र त्यांच्या हक्काचं मागतोय, नोकऱ्या मागतोय. रोजगाराच्या सर्व संधी गुजरातला नेल्या जात आहेत. ते उद्योगधंदे गुजरातला गेल्यावर आम्हाला भीक दिल्यासारखे पंधराशे रुपये देत आहात? महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि कुणासमोरही झुकणार नाही.

गद्दारांना क्षमा नाही

विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी माझा पक्ष फोडला नाही, पण या चाळीस गद्दारांनी माझा पक्ष फोडला, चोरला. आणि जे महाराष्ट्र लुटत आहेत त्यांच्या चरणी तो वाहून टाकलाय अशा लोकांना क्षमा नाही.