आता RCF सुद्धा अदानीच्या घशात घालणार का? उद्धव ठाकरे यांचा जळजळीत सवाल

मुंबईतले मोक्याचे भुखंड अदानी – लोढाच्या घशात घातले जात आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच मुंबईला हद्दपार करण्याची सुपारी या सरकारने घेतली आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आरसीएफच्या कर्मरी संघटनेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, संकटं नव्याने आपल्यापुढे उभी राहत आहेत आताच्या खोके सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झालाच पाहिजे अशी या सरकारने सुपारी घेतली आहे. इथे खासगीकरणाचा विषय निघाला आहे, बघुया कुणाला एवढी खाज आली आहे ती. ही व्यापारी वृत्ती अतिशय घाणेरडी वृत्ती आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईला संपवायचं, वैशिष्ट्य मारायचं, मराठी माणासाला बेकार करायचं. आता नोकरीच्या जाहिराती येत आहेत, मुंबईत मराठी माणसाला नो एन्ट्री. बिल्डिंग ज्या उभ्या राहिल्या त्यात नो एन्ट्री. 1966 चा काळ जर पुन्हा उभा करायचा ठरवला तर त्यात चुकीचं काय? या मुंबईत सगळे गुण्यागोविंदाने राहत आहेत, या हिंदुंचं संरक्षण आम्ही हिंदू म्हणून केलं. आता आपल्यासोबत इतर समाजाचेही लोक येत आहेत. एवढं सगळं व्यवस्थित सुरू असताना मिठाचा खडा का टाकताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

RCF ही संपूर्ण देशाची अन्नदाता आहे. त्यांना तुम्ही खतं देता. त्या खतावर मोदींचा फोटो, लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो होता. लस त्यांनी निर्माण केली असा आमचा उपमुख्यमंत्र्यांचा सूर होता. खताचं काय, खत कोणी तयार केलं असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

वांद्र्यात सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत होती. ही जागा कोर्टाला गेली होती. पण मी मुख्यमंत्री असताना ही जागा मी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवली. पण आता काय निर्णय झाला माहित नाही. आता आरसीएफ सुद्धा अदानीच्या घशात घालणार का? नाहीतर वांद्रे रेक्लमेशनला सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्या आमचा पाठिंबा आहे असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

बीकेसीचा मोक्याचा भुखंड बुलेट ट्रेनला देऊन टाकला. ज्याची गरज नाही, ते आमच्या माथी मारले जाते आहे आणि जे मराठी माणसं आहेत, त्यांना मिठागरात फेकून देणार. धारावीच्या जास्तीत जास्त लोकांना अपात्र ठरवून मिठागर, दहिसर, मुलुंडला फेकून द्यायचे. आणि मोक्याचे भुखंड अदानी आणि लोढाच्या घशात घालायचे. हे होऊ देणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारने नवीन योजना आणली आहे, लाडकी बहीण योजना. गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये. गद्दारांना भरभरुन द्यायचे आणि निवडून देण्यासाठी लाच देता. पुन्हा निवडून आल्यावर हे बेघर करणार. हे होऊ न देण्यासाठी आमदार आणि नगरसेवक निवडून आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.