जनता ही वाघनखं आहेत आणि ही वाघनखं तुमच्या राजकारणाचा कोथळा बाहेर काढणार असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागरपुरात केले. तसेच भ्रष्टाचारी गुंड पुंड भाजपमध्ये प्रवेश करतात, हीच तुमची भाजपची संकल्पना आहे का असा सवालही त्यांनी केला.
नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, अजूनही निवडणुकीचं वातावरण तापलेलं नाही. मुंबईत काही लोक मला म्हणतात की अजून काही पेटलं नाही. त्यांना मी म्हटलं की एकदा पेटेल ना तेव्हा विझवायला वेळ लागेल, म्हणून धीराने पेटू द्या. फटाके फुटायला दिवाळी बाकी आहे. रामटेककरांचे लाख लाख धन्यवाद, रामटेक हा आपला बालेकिल्ला. महाविकास आघाडी म्हटलं की त्यात कद्रूपणा नाही करायचा. पाठीमागून वार करायचा नाही, रामटेक मागितला, रामटेक दिला. मला अभिमान आहे, जे शिवसेनाप्रेमी आहे शिवसैनिक आहेत त्यांनी कद्रूपणा केला नाही. रामटेकमध्ये महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला त्याबद्दल तुमचे आभार.
शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने मुंबईच्या सिनेट निवडणुकीत शिवसेनाचा विजय झाला. दोन वर्ष निवडणूक हे पुढे ढकलत होते. आपम विजयोत्सव साजरा करत होतो तेव्हा काही लोक बोलत होते की जणू काय या निवडणुकीमुळे देशाचा पंतप्रधान निवडला जाणार आहे. होय होतीच, कारण जे मतदार होते ते सुशिक्षत मतदार या देशाची लोकशाही मानणारे नागरिक आहेत. कालच्या निवडणुकीत ईव्हीएम नव्हतं अभाविपची डिपॉजिट जप्त झाली. हेच चित्र मला राज्यभर दिसत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभलं. हा पुतळा खरचं दिमाखदार आहे. मालवणच्या किनाऱ्यावर जे घडलं ते संपूर्ण देशाला लाजिरवाणी दुर्घटना झाली. एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं. फक्त लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी, शिवसेनेच्या ताब्यातलं कोकण जिंकण्यासाठी पंतप्रधान त्या किनाऱ्यावर आले आणि नौदल दिन साजरा केला. पण नौदलाचं सामर्थ्य दाखवताना ज्यांनी हिंदुस्थानाचं आरमार उभारलं त्यांचा पुतळा उभा करताना त्यात तुम्ही पैसे खाल्ले. आमचे मिंधे दाढी खाजवत म्हणाले की वाऱ्य़ाने पुतळे पडला. वाऱ्याने तुमची दाढी नाही हलत. बेशरमपणे सांगतात. आम्ही यांना जोडे मारले तर बोलतात जोडे का मारले.
आठ दहा दिवसांपूर्वी येऊन गेले ज्याला मी बाजार बुणगा म्हटलं, नागपूरमध्ये येऊन गेले. मला औरंगजेब फॅनक्लबचे अध्यक्ष म्हटले. मी त्यांना म्हटलं तुम्ही अमित शहा नाही अब्दाली आहात अहमदशाह अब्दाली. बंद दाराआड म्हटलं त्यांनी उद्धव ठाकरेंना संपवा, शरद पवारांना संपवा, त्यांचा पक्ष फोडा, त्यांचे कार्यकर्ते फोडा. अमित शाहजी तुमचे हे बंद दाराआडचे हे धंदे सोडा. हिंमत असेल तर इथे मैदानात या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करा. हे उपरे, बाजारबुणगे येतात आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला गुलाम करण्याची भाषा करतात. शिवसेना संपवण्याची भाषा करतात. हिंमत असेल तर या, तुमच्या किती पिढ्या येतात ते बघतोच. का शिवसेना संपवायची? आम्ही तर तुमच्याच बरोबर होतो. आज माझ्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार आहेत. पण आम्ही भाजपसोबत होतो ना. 25 -30 वर्ष हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत होतो. मग हिंदुत्वावादी असताना 2019 साली सोडा पण 2014 साली काय घडलं की तुमचा पंतप्रधान बसल्यावर एकनाथ खडसेंनी सांगितलेली ही गोष्ट जी खरी आहे. निवडणुकीला 15 दिवस असताना सहा साडेच्या सुमारास एकनाथ खडसेंचा फोन आला. जागावाटप अंतिम टप्प्यात आला होता, खडसेंचा फोन आला. मी विचारलं काय झालं. दोन चार जागांचा प्रश्न आहे. खडसे म्हणाले की वरून मला सांगण्यात आलं की आपली युती तुटली. युती तुटल्यानंतर एकटी शिवसेना लढली आणि 63 जागा निवडून आणल्या. यांना महाराष्ट्र गिळायचा आहे म्हणून शिवसेना नको. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे असा तसा नाही जाणार. गिळायचा प्रयत्न केला तर अफझल खानाने जो महाराजांच्या बाबतीत केला तो प्रयत्न करून बघा नाही तुमचा राजकारणातला कोथळा ही वाघनखं बाहेर काढतील. ही जनता आमची वाघनखं आहेत. आम्ही काही मुनंगटीवार नाहीत. बोलतात काय करतात काय जातात कुठे.
2014 ला त्यांनी युती तोडली होती. 2019 साली तेच केलं. पण तुम्ही युती तोडली तेव्हा आम्ही हिंदु होतो की नव्हतो? काँग्रेस सोबत आम्ही गेलो तेव्हा आम्ही हिंदुत्व कसं सोडलं ? म्हणे शिवसेनेची काँग्रेस झाली आहे. 25-30 वर्ष तुमच्यासोबत राहून मी शिवसेनेची भाजप नाही होऊ दिलं तर दोन ती वर्षात काँग्रेस होऊ देईन का? आमच्यासोबत असला की साधू संत आणि दुसऱ्यासोबत असला की चोर अशी भाजपची नीती आहे. तुमच्यासोबत असला की चोर आणि आमच्यासोबत असला की साधू संत हे कुठला तुमचे हिंदुत्व? भाजपचं हे हिंदुत्व नाही तर हे थोतांड आहे. नागपूर म्हणजे संघाचं मुख्यालय. या नागपुरातच मोहन भागवत यांना विचारू इच्छितो की मोहनजी आम्ही तुम्हाला हवे नको की हा भाग सोडा. पण भाजप आज ज्या पद्धतीने हिंदुत्व म्हणून थयथयाट करत आहे ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? भाजप सर्व गुंड पुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत आहेत ही तुमची भाजपची संकल्पना आहे का? सर्वसामान्यांमध्ये भांडण लावून बावनकुळेसारखे लोक भुखंडाचे श्रीखंड खात आहेत. मला वाटलं अदानीचा राक्षस फक्त मुंबईत आहे. पण आज मी वाचलं की चंद्रपूरची एक शाळा अदानीला देऊन टाकली. अदानी म्हणजे काय राष्ट्रसंत आहे की काय त्यांच्या नावाने जय अदानी बाबा अशी आरती म्हणणार. बाकीची माणसं काय मेली आहेत का?
One nation one election नाहीये वन नेशन वन कोन्ट्रॅक्टर ही एकच मोदींची धारणा आहे.एकच कोन्ट्रॅक्टर असला पाहिजे तो म्हणजे अदानी अशी मोदींची भुमिका आहे. काही लोक घराणेशाहीवर टीका करतात आणि म्हणतात की काही लोकांना फक्त त्यांचं कुटुंब सांभाळायचं आहे. हो ही जनता माझी कुटुंब आहे, जेव्हा कोरोना आलो होतो. तेव्हा भाजप आणि तेव्हाचे राज्यपाल कोश्यारी सुद्धा बोंबलत फिरत होते मंदिरं उघडा, मशिदी उघडा, चर्चेस उघडा. कोरोनाचा फैलाव वाढेल म्हणून ही प्रार्थनास्थळं उघडू दिली नाही. मला अभिमान आहे की भाजपवाले कितीही बोंबलले तरी महाराष्ट्राच्या जनतेने मी कुटुंबप्रमुख म्हणून जे काही बोललो ते त्यांनी मानलं. म्हणून योगींच्या राज्यात जे घडलं ते माझ्या महाराष्ट्रात घडलं नाही. हे तुमचं कर्तुत्व आहे माझं नाही.
हा लढा फक्त शरद पवार आणि काँग्रेसचा नाहीये हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे. क्षणभर असा विचार करा की शिवाजी महाराज तुमच्या गावामध्ये अवतरले आहेत. आणि ते बघत आहेत की तुम्ही फक्त माझा पुतळा उभा केला आहे की जी शिकवण मी तुमच्या धमन्यांमध्ये टाकलेली आहे त्या तेजाला तुम्ही जागता आहात. महाराष्ट्रावर तेव्हा जे संकट आलं होतं ते संपूर्ण देशावर संकट आलं होतं. तेव्हा हे तेज जन्माला आलं नसतं तर मोदी आणि शहा जन्माला आले असते की नाही हे माहित नाही. आज ते जन्माला आले त्याचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुल्तानी संकट रोखलं. म्हणून आज हे दिल्ली बघू शकतात. आणि आज दिल्ली आम्हाला डोळे वटारून दाखवते. त्यांना माझ्या महाराष्ट्राची जनता एवढी कमकुवत वाटते का? जनता कमकुवत नाही तर तुमच्या साक्षीने आणि तुमच्या वतीने सांगतोय की तुमची भीक आम्हाला नकोय. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. आमच्या मनगटात जोर आहे आमच्या हक्काचा दाम आम्ही मागतोय. तुमची फुकटची गद्दाराची कमाई आम्हाला नकोय.
मिंधे आणि गुलाबी जॅकेटवाले महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. आज त्यांची मस्ती सुरू आहे. योजनांचा पाऊस पाडत आहेत, लाडकी बहीण योजना. माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही बहीणींना देत आहेत. मीसुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ना.पण स्टेज टाकून एक तरी कार्यक्रम घेतला का मी. कारण मी माझे पैसे दिले नव्हते तर तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला दिले होते. आज आमच्याकडे काहीच नाही. काँग्रेसकडे पक्ष आणि चिन्ह तरी आहे. मी आणि अनिल देशमुख आमचा पक्ष आणि निवडणूक चिन्हही चोरले.
माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. तरी मला बोलावून महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते केलं. तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. तरी तुम्ही मला बोलावलं. उद्धव ठाकरेंना संपवण्याचा विचार करणाऱ्यांनी हे पाहावं. याचा अर्थ उद्धव ठाकरे फक्त माणूस नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. मला माझ्या महाराष्ट्रावर अमित शहांपेक्षा जास्त प्रेम आहे. हे सरकार उलथवून टाकायचं म्हणजे टाकायचं हे वचन मी तुम्हाल देतो. नागपुरातल्या उमेदवारांचं डिपॉजिट जप्त झालं पाहिजे. नागपुरात मला निसटता विजय नकोय दणदणती विजय पाहिजे. आपलं सरकार आल्यानंतर राज्याची जी लूट सुरू आहे ती थांबवून दाखवेन. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा इथला एक तरी उद्योग गुजरातमध्ये गेल्याची बातमी होती का? मग अडीच वर्ष मिंधे एवढे लाचार झाले की एवढे उद्योग गुजरातमध्ये गेले. नागपुरचा एक उद्योग गुजरातला गेला, वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेला. मुंबईचे आर्थिक केंद्रही गुजरातला. म्हणून यांना शिवसेना संपवायची आहे. त्यांच्या महाराष्ट्र लुटीला आड येणारी ही शिवसेना आहे. पण ही फक्त सत्तेची लढाई नाही तर महाराष्ट्राची लूट थांबवण्याची लढाई आहे. जो जो स्वाभिमानी असेल, महाराष्ट्र प्रेमी असेल तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिल. रामटेकचे सहा उमेदवार कोणीही असेल तरीही निवडून आणून देण्याचे वचन द्या.