पुढील पिढ्या हुकूमशहांच्या हातात देण्याचे पाप करू नका! भाजप आणि रा.स्व संघासह अंधभक्तांनाही उद्धव ठाकरेंचे आवाहन

पक्ष चोरणारे, फोडणारं, हिंदूंमध्ये भेदभाव करणारे तुमचे हिंदुत्व आहे का ? मी हुकूमशाहीला हिंदुत्व मानणार नाही. मत तुमचे आणि किंमत त्यांना, हे चालणार नाही. तुम्हाला आता हिम्मत दाखवावी लागेल. असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अगदी अंधभक्तांनाही आवाहन करताना म्हटले की, पुढील पिढ्या हुकूमशहांच्या हातात देण्याचे पाप करू नका.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शुक्रवारी रायगड जिह्यातील झंझावाती दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पोलादपूर येथील देवीची सहान येथे झालेल्या त्यांच्या सभेला तुडुंब गर्दी लोटली होती. या गर्दीच्या साक्षीनेच भाजपच्या हुकूमशाहीवर आणि फंदफितुरी करणाऱया गद्दारांवर उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला.

400 पार कसे होता मी बघतोच

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. यावरही उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत प्रहार केला. ‘पक्ष चोरला मग माझ्या माणसांच्या मागे का लागता ? तुम्ही 400 पार होणार आहात ना, व्हा ना मग; आता आम्ही तुम्ही 400 पार कसे होता तेच बघतो.’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. भाजप हा भ्रष्ट, भेकड, भाकडांचा, बेडकांचा पक्ष असून जुन्या केस काढून शिवसैनिकांना त्रास दिला जात आहे, असे ठाकरे यांनी म्हटले. जर असे असेल तर तुमच्याकडे जे टोणगे, बाजारबुणगे आले आहेत त्यांच्या केसचाही आम्हाला जनतेसमोर भंडाफोड करावा लागेल असे उद्धव ठाकरेंनी बजावले.

महाराष्ट्र कंगाल करायचा आणि गुजरातची भरभराट करायची हे चालणार नाही असे बजावतानाच उद्धव ठाकरे यांनी गद्दारांचाही कडक शब्दात समाचार घेतला. छत्रपती सुरतला स्वराज्यासाठी , इंग्रजांची वखार लुटायला गेले होते, आणि हे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पायी लोटांगण घालायला गेले होते. महाराज स्वराज्यासाठी गेले होते, आणि हे महाराजांनी दिलेले स्वराज्य लुबाडणाऱ्यापुढे शेपूट हलवायला गेले होते. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी प्रहार केला.

भ्रष्टाचार करा भाजपमध्ये या, आपको कुछ नही होगा: हीच मोदी गॅरेंटी आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. काहींना दिव्य शक्ती असते की ते दुसऱ्याचा आजार आपल्यावर घेतात असे म्हणतात. तसे हे दुसऱ्याचा भ्रष्टाचार स्वत:वर घेऊन त्यांना पावन करतात असा जबरदस्त टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

नवी जॅकेट, नवे नॅपकीन घेतले तरी मंत्रीपद मिळालं नाही

गद्दारांवर प्रहार करताना शिवसेना पक्षप्रमुख मिंधे गटातील आमदार भरत गोगावले यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला. ही नरवीर तानाजी मालुसरेंची भूमी आहे, याच भूमीत नॅपकीन फडकावणारे खूप झालेत. मंत्रीपदाचे स्वप्न पाहताना त्यांनी नवे कोट जॅकेट शिवसेन अगदी नवे नॅपकीनही घेतले पण यांना मंत्रीपद मिळतच नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मी घराण्याची परंपरा मानणारा

घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांनाही उद्धव ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिले. मी घराणेशाही नाही तर मी घराण्याची परंपरा मानणारा आहे, मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. घराणेशाहीबद्दल तुम्हा तिटकारा असेल तर जी डबल गद्दारी रायगडात (सुनीलतटकरे , अदिती तटकरे) झाली आहे ते तुम्हाला चालतं ? तुम्ही जाहीर करा यांच्यापैकी एकालाही तिकीट देणार नाही, बघा ते घराणं तुमच्यासोबत राहतं का ?, असे ठाकरे यांनी म्हटले.