
‘सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनाची पकड घेणारा आणि सर्व बाजूंनी परिपूर्ण असलेला असा चित्रपट मी बऱयाच वर्षांनी पाहिला. अफलातून आणि अप्रतिम असे या चित्रपटाचे वर्णन करता येईल,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘दशावतार’ या चित्रपटाचे कौतुक केले.
कोकणच्या मातीतील कलेला 70 एमएमचा अवकाश उपलब्ध करून देणारा ‘दशावतार’ चित्रपट सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या व्यक्तिरेखेचेही जोरदार कौतुक होत आहे. आज सांताक्रूझ पश्चिम येथील लाइट बॉक्स प्रीह्यू थिएटरमध्ये या चित्रपटाचा विशेष शो झाला. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी चित्रपटासह कलाकारांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.
ही कथा कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील आहे. अनेकदा असं होतं की एखाद्या चित्रपटात केवळ व्यथा मांडली जाते, पण त्यावर इलाज सांगितला जात नाही. ‘दशावतार’मध्ये कथा आहे, व्यथा आहे आणि त्यावर इलाजही सांगितला आहे हे याचे वेगळेपण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ कोकणीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी हा चित्रपट पाहायला हवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. आपल्याला कुठल्या दिशेने नेले जात आहे हे ‘दशावतार’मधून कळते. कुठलेही राजकारण न आणता त्याकडे पाहायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रभावळकरांच्या अभिनयाचे कौतुक
दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचेही उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. दिलीपजींना आपण कित्येक वर्षे पाहत आलो आहोत. त्यांच्या अभिनयाला तोडच नाही. या वयातही तुम्ही असं काम करू शकता, असे अनेकदा लोक त्यांना विचारतात. मी उलटं म्हणेन की या वयात ते असं काम करत असतील तर पुढे आणखी काय करतील. खरोखरच त्यांनी अविश्वसनीय काम केले आहे. संपूर्ण टीमने उत्तम काम केलंय. कोणालाही नाव ठेवायला जागा नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच
‘दशावतार’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने 9 कोटी 45 लाखांचा गल्ला जमवला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सहकुटुंब ‘दशावतार’ हा चित्रपट पाहिला. यावेळी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी दशावतारच्या टीमचे कौतुक केले. अभिनेते दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, दिग्दर्शक सुबोध खानोलकर, निर्माते सुजय हांडे, ओंकार काटे, निर्माते अजित भुरे, बवेश जानवलेकर, गायक-संगीतकार अजय गोगावले, अभिनेत्री छाया कदम यावेळी उपस्थित होते.