
सर्वोच्च न्यायालयच शेवटची अशा असून निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव बदलाचा किंवा कोणाला देण्याचा अधिकार नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.
विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय ऑगस्टपर्यंत निकाल देणार असतील, ती नक्कीच समाधानकारक गोष्ट आहे. आमची शेवटची एक अशा सर्वोच्च न्यायालयच आहे, जिथे या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवडा होईल. कारण आज जे आमचं चिन्ह चोरलं गेलं आहे. मी नेहमी सांगतो, निवडणूक आयोगाला निवडणुकीचे चिन्ह देण्याचा अधिकार आहे. मात्र पक्षाचं नाव बदलण्याचं अधिकार नाही. कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं, हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाही, असूच शकत नाही आणि आम्ही तो मान्य करत नाही. एखाद्या पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला कोणाला द्यायचं, हे निवडणूक आयोगाचं कार्यक्षेत्र नाही. निवडणूक निशाणी याप्रकरणी खटला सुरू आहे, पण पक्षाचे नाव आम्ही त्यांचा अधिकार मनात नाही.”
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील 11 आणि तामीळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक मी 2010 मध्ये प्रकाशित केलं होतं, त्यावेळी मी एरियल फोटोग्राफी केली होती. माझ्या फोटोग्राफीचा विषय, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हाच होता. यात मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, भूगोल आणि इतिहास यांची सांगड त्यावेळी घातली गेली होती. तेव्हाचे दिवस, तेव्हाच काळ हा कसा होता आणि त्याही काळा तछत्रपती शिवाजी महाराज यांनी अवघड ठिकाणी, दुर्गम भागांमध्ये गडकिल्ले बांधून कसं स्वराज्य स्थापन केलं, हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. आता युनेस्कोने ही याला दर्जा दिला. तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणं, हे सरकारसोबतच आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “यानिमीत्ताने आणखी एक उल्लेख करावा लागत आहे की, तो म्हणजे हिरोजी इंदुलकर यांचा. हिरोजी इंदुलकर यांच्या अधिपत्याखाली रायगडाचं बांधकाम झालं. सिंधुदुर्ग आणि प्रतापगड आणि आणखी काही किल्ले त्यांच्या अधिपत्याखाली बांधले गेल्याचं माझ्या ऐकिवात आहे. आपण जर रायगडावर गेलो तर, तिथे छत्रपती शिवरायांची समाधी आहे आणि जगदीश्वराचे मंदिर आहे. त्याच्याच खाली एक पाटी आहे. त्या पाटीवर असं कोरलं आहे की, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’. या सगळ्या आपण इतिहासातील ऐकलेल्या गोष्टी आहेत. त्यांनी रायगड बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज खुश झाले आणि त्यांनी विचारलं, हिरोजी काय पाहिजे तुला? ते म्हणाले काही नको, मला तुमच्या सेवेची संधी देत राहा, तुम्ही बोला, तुमच्या सेवेला मी कधीही तत्पर आहे. तेव्हा असे निष्ठावंत मावळे होते. आज याला युनेस्को एक दर्जा दिला आहे, म्हणून नाही तर, याची एक महानता आहे, ती कायम होती आणि राहील.”
आगामी बिहार निवडणूक आणि इंडिया आघाडीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. लवकरात लवकर ही बैठक व्हावी, असं मला वाटतं. बिहार आणि इतर राज्यांच्या निवडणुका येत आहेत. राज्यातही पालिका निवडणुका होणार आहेत, यासाठी बैठक व्हायला हवी.”