जागावाटप, मुख्यमंत्री कोण याची चिंता सोडा! उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

सामना ऑनलाईन, मुंबई

जागावाटप कसं होणार, मुख्यमंत्री कोण होणार हे प्रश्न विचारले जातात. यापेक्षा जनतेला न्याय कोण देणार याचं उत्तर ‘शिवसेना’ आहे. तेव्हा आमदार, जिल्हाप्रमुख, गटप्रमुख, सर्व शिवसैनिक शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात, शेतात उतरायला हवेत. शेतकऱ्यांच्या योजना अडवणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांना ठोकून काढा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

शिवसेनेचे मंत्री, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांची बैठक बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचतात की नाहीत याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश शिवसैनिकांना दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, पी. साईनाथ यांचे ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पुस्तक आहे. या पुस्तकात लिहिलेले मुद्दे तंतोतंत लागू होणारे आहेत. शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर होतात, मदत जाहीर होते पण त्यांच्यापर्यंत पोहचतात का? त्या योजना मध्येच झारीतल्या शुक्राचार्यांकडून अडवल्या जातात. या शुक्राचार्यांना ठोकून काढा.

शिवसेनेचा वाघ काय असतो हे दाखवून द्या!

आपण एक इशारा दिला तर शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळू लागले आहेत. एका शेतकऱ्याचा तर शिवसेनेमुळे 35 हजार रुपयांची विम्याची रक्कम खात्यावर जमा झाल्याचा व्हिडीओच व्हायरल झाला आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या घराघरात जा पण घरात जाऊन केवळ चहा पीत बसू नका. जिथे शिवसैनिक आहे तिथे अन्याय करणारा पळून गेला पाहिजे आणि अन्याय झालेल्याला दिलासा मिळायला हवा. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ ही आपली घोषणा आहे. शिवसेनेचा वाघ काय असतो हे दाखवून द्या, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

निवडणुकीच्या तोंडावर मुद्दे घेणारच

दुष्काळ पाहणीसाठी गेलो तेव्हा बैल गेला आणि झोपा केला अशी टीका करण्यात आली. पण त्यानंतर अजूनपर्यंत कित्येक दिवस पाऊस पडलेला नाही. दुष्काळाची परिस्थिती भयंकर आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुद्दे घेतात असं बोलतात. युती केल्यावरही टीका झाली, पण मी टीकेला घाबरत नाही. शिवसेनेला लोकांनी भरभरून मतं दिली. कारण त्यांना शिवसेनेचा प्रामाणिकपणा माहीत आहे. संकटात आपल्यावरचं संकट कोण दूर करेल तर ती शिवसेना हा विश्वास त्यांना आहे. तेव्हा जनतेसाठी निवडणुका तोंडावर असल्या तरी मुद्दे मांडणारच, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राहणार

लोकसभेच्या आधीपासून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहोत. सत्तेत नव्हतो तेव्हाही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होतो. सत्ता आली तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं शिवसेनाप्रमुखांनी वचन दिलं होतं. पण दुर्दैवाने त्यावेळी सत्ता आली नाही. तेव्हाही रस्त्यावर उतरल्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी कर्जमाफी केली. आता सरकारमध्ये आहोत. इथे आल्यावर मर्यादा येतात, पण शिवसेना सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिली असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

प्रचारात आपण काय बोललो जनतेने ऐकले, आता जनतेचे आपल्याला ऐकायचेय

कुपोषणाचे बळी आणि अन्नदाता कर्जबाजारी हे दोन टोकाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत आपण कुणासाठी काम करायचे, असा प्रश्न उपस्थित होतो. अलीकडेच शेतकऱ्यांशी संकाद साधला. संकटात त्यांची विचारपूस करणारी एकमेव शिवसेना आहे असे त्यांचे मत आहे. शेतकऱ्यांचे मुद्दे मी अमित शहा यांच्याजवळ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडले आहेत. या मुद्दय़ांवर कार्यकाही सुरू झाली आहे अशी माहिती ठाकरे यांनी दिली. निवडणुकीत आपण काय बोललो हे लोकांनी ऐकले, आता शेतकरी काय बोलतात ते मला ऐकायचे आहे, असेही ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या ताकदीला आव्हान देऊ नका

दुष्काळ नैसर्गिक असतो. पण जेव्हा आपल्यातलं माणुसकीचं नातं  आटतं तेव्हा हाच दुष्काळ अधिक भयानक होतो. अद्यापही पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांची पेरणी वाया जातेय. पुढेही असे प्रश्न निर्माण होणार. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना हैराण केलेय. पण या शेतकऱ्याचा राग वेळीच आवरला नाही तर सत्तासनं भस्म केल्याशिवाय राहणार नाही हे मी आधीच सांगितलेय. जनता मुकी-बहिरी आहे असं समजू नका. ती सहनशील आहे. ती जेव्हा आवाज काढते तेव्हा राजेरजवाडय़ांना देश सोडून जावं लागतं. तेव्हा जनतेच्या ताकदीला आव्हान देऊ नका असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

42 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी अडली -किशोर तिवारी

शिवसेनेच्या बैठकीला शेतीतज्ञ किशोर तिवारी हेही उपस्थित होते. ते म्हणाले, 42 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी छोटय़ा छोटय़ा कारणांनी अडली आहे. सरकारने पीककर्जाचे पैसे बँकांना दिले, मात्र तांत्रिक कारणांमुळे बँकांनी 60 टक्के शेतकऱ्यांचे पैसे अडकून ठेकले आहेत. याकर गंभीर चर्चा करण्याची केळ आली असून शिवसेनाच सरकारला जाब विचारू शकते. सरकारने खासगी पीकविमा कंपन्या काढून टाकाव्यात आणि त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा राबवाकी अशी मागणीही तिवारी यांनी केली.

केवळ सरकारच्याच गळ्यात घंटा बांधणार का?

शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत केंद्रे सुरू केली म्हणून केवळ सरकारच्याच गळ्यात घंटा बांधून वाजवत बसणार का? मी काय करणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यावर संकट आलं तर शिवसैनिक धावून जातो हा विश्वास शिवसेनेने जनतेला दिला आहे. शेतकऱ्याचा विश्वास हा  आशीर्वाद आहे. तो कमावण्यासाठी नातं जोडावं लागतं. ते नातं शिवसैनिकाचं शेतकऱ्यांशी आहे. हे नातं अधिक घट्ट करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कर्जमाफीची अंमलबजावणी तपासणे हा वचनपूर्तीचा भाग

आपण जे मुद्दे तयार केले आहेत ते सरकारला एक धोरण म्हणून सादर करू. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू ही घोषणा म्हणजे दिलेले वचन. त्यांच्यासाठी कर्जमाफी जाहीर होणे ही जशी वचनपूर्ती आहे त्याप्रमाणेच कर्जमाफी झाली की नाही याचा पाठपुरावा करणे हा वचनपूर्तीचाच एक भाग आहे. ही वचनपूर्ती केल्याशिवाय मी राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.