
गद्दारांचा बुडबुडा आता फुटला आहे. त्यांच्यात अक्षरशः मारामारी व बाचाबाची सुरू आहे. त्याला पंटाळून किंवा त्यांचे खरे रूप समजल्यामुळे हे लोक पुन्हा शिवसेनेत येत आहेत, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप व अजित पवार गटाचे लोकही शिवसेनेत येत आहेत. रोजच पक्षप्रवेश होत आहेत. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटला आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
सत्ताधारी महायुतीकडून पैशांची उधळपट्टी सुरू आहे. तुम्ही एक-दोन दिवसांच्या दौऱ्यांसाठी किती कपडे नेणार? हेलिकॉप्टरमध्ये किती सामान नेता तुम्ही? काय करता काय? असा सवाल करत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. आता शिंदे गटातील लोक एकमेकांवर धाडी टाकत आहेत. ज्यांच्यावर धाड टाकली त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, पण ज्यांनी धाड टाकली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. हे सर्व फार घाणेरडय़ा पद्धतीने होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ‘देशाचे असे चित्र आपल्याला अपेक्षित नव्हते. हे सर्व वेळेत लक्षात आल्यानंतर तुम्ही इकडे परत आला आहात, याचे मला काwतुक वाटते. आणखी असे अनेक लोक आहेत. ते थोडे संभ्रमात आहेत. भाजप म्हणजे देशाचा तारणहार आहे असा समज करून देणे हाच मुळात एक प्रचंड मोठा घोटाळा आहे. या घोटाळय़ातून अनेकजण आता जागे होत आहेत. उरलेल्या लोकांना तुम्ही जागे करा. आगामी मुंबई, ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपलाच शिवसेनेचा झेंडा फडकवा,’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.




























































