शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जन्मशताब्दी वर्षातच पूर्ण करा! उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम 23 जानेवारी 2027 पूर्वी म्हणजेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण झाले पाहिजे. त्यासाठी कामामध्ये अजिबात खंड पडू देऊ नका, अशा सूचना स्मारकाचे अध्यक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळील महापौर बंगल्याच्या जागी उभारण्यात येणाऱया स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या ट्रस्टींची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्या बैठकीत स्मारकाच्या कामाचा संपूर्ण आढावा घेण्यात आला. आतापर्यंत किती काम पूर्ण झाले आणि पुढे काय काम होणार यासंदर्भात या बैठकीत माहिती देण्यात आली.

पुढील टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया कशी असेल, कर्मचाऱयांचे नियोजन कसे असेल या बाबींवर चर्चा झाली. स्मारकामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले तर आर्किटेक्ट आभा लांबा यांनी स्मारकातील कामाचे सादरीकरण केले. स्मारकाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन यावेळी राज्य शासनाकडून देण्यात आले.

या बैठकीला स्मारकाचे सचिव, शिवसेना नेते सुभाष देसाई, स्मारकाचे सदस्य व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, भाजपचे पराग अळवणी, शिंदे गटाचे शिशिर शिंदे, राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे संजय मुखर्जी व अन्य अधिकारीवर्ग उपस्थित होता.

सोमवारी दुसरी बैठक

राज्य सरकारने या राष्ट्रीय स्मारक समितीची गेल्या नोव्हेंबरमध्ये पुनर्रचना केली होती. त्यानंतर समितीची आजची पहिलीच संयुक्त बैठक होती. दुसरी बैठक येत्या सोमवारी स्मारकामध्येच दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामध्ये पुढील आवश्यक बाबींवर चर्चा आणि निर्णय होणार आहे.