मतचोरांना हद्दपार करण्यासाठी मराठी आणि अमराठीही एकत्र आले आहेत! उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

मतचोरी करून सत्तेत बसलेल्या चोरांना वाटत होते की त्यांची चोरी पकडली जाणार नाही, पण त्यांची चोरी विरोधी पक्षांनी चोरासकट पकडली आहे. या सर्व चोरांना हद्दपार करण्यासाठी मराठी माणसासोबत अमराठीही एकत्र आले आहेत, कारण कुणालाच हुकूमशाही नको आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाला इशारा दिला.

नाशिकमधील नाशिक रोड येथील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड, त्यांचे पती भाजप पदाधिकारी हेमंत गायकवाड यांनी समर्थकांसह आज मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजपला चिमटे काढले. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत उद्धव ठाकरे म्हणाले की, आज नरक चतुर्दशी आहे.

कृष्णाने नरकासुराचा वध केला तो हा दिवस. नरकासुर कोण हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आगामी निवडणुकीत आपल्याला महाराष्ट्रावरील भाजपचे नरकासुराचे संकट नेस्तनाबूत करायचे आहे. नाशिकमध्ये याच भाजपचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आली आहेत. त्यामुळे आता हा प्रवाह सुरू झाला आहे.

इतिहासात पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका!

राज्यासह देशभरात मतचोरीचा मुद्दा गंभीर बनला आहे. त्याकडे लक्ष वेधत उद्धव ठाकरे यांनी भाजप कार्यकर्त्यांना यावेळी महत्त्वाचा सल्ला दिला. ‘मी भारतीय जनता पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना आज विनंती करतोय की, मतचोरांची चोरी चोरासकट पकडली गेली आहे. तेव्हा आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात, याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका. हीच दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि नम्र विनंतीही करतो,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

खोकेवाले नेभळट… हे कट्टर आणि निष्ठावंत!

आपला महाराष्ट्र नेहमीच लढणारा आहे. आज तुम्ही सगळे जण शिवसेनेत आलात. सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला काही खोकेबिके मिळाले का… काही धाकदपटशहा…तुमच्या मागे कोणती एजन्सी… असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावर अजिबात नाही, असा आवाज उपस्थितांमधून घुमला. लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती नेभळट माणसं त्याच्यापेक्षा हे कट्टर आणि निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहेत ते मला प्रिय आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

एका चांगल्या दिवशी हे पक्षप्रवेश होत आहेत. आज नरक चतुर्दशी आहे. कृष्णाने नरकासुराचा वध केला तो दिवस. आता नरकासुर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आला आहात. आता हा प्रवाह सुरू झाला आहे. आजपर्यंत जे मतचोरी करून तिकडे बसलेत त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कुणी पकडू शकणार नाही. पण चोरी चोरासकट आपण पकडली आहे. आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्व मराठी माणसं आणि त्यासोबतच अमराठीही एकत्र आलेले आहेत. कोणालाच हुकूमशाही नको आहे.

मी भगवा फडकवूनच ‘पुन्हा येईन’!

नाशिकमध्ये मी एकदा येऊन गेलोय. आता ‘मी नाशिकमध्ये पुन्हा येईन’, असे उद्धव ठाकरे म्हणताच हशा पिकला. टाळ्यांचा कडकडाट झाला. मला तुमच्याकडून वचन हवं आहे ते म्हणजे मी येईन तो भगवा फडकवूनच येईन… तो भगवा फडकवण्यासाठी आई जगदंबा आपल्याला निरोगी, उदंड, दिर्घायु आरोग्य देवो, हीच प्रार्थना करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.