वाचावे असे काही – अनोखी शब्दकळा

>> धीरज कुलकर्णी

सावंतवाडीचे भूमिपुत्र कवी वसंत सावंत. आजच्या नव्या पिढीसाठी नाव ठाऊक असण्याची शक्यता कमीच. महानगरातील पैसे, पद, प्रतिष्ठा यांना सोकावलेले ते प्रस्थापित कवी नव्हते. सावंतांची कविता ही खरी कोकणातल्या मातीची, निसर्गाची कविता आहे. त्यांनी आयुष्यभर कवितेशी इमान ठेवले. प्रेम, निसर्ग, समाज, नाती कोणताही विषय त्यांच्या कवितेला वर्ज्य नव्हता. वर्ज्य काय होतं तर शब्दांशी बेइमानी. उगवाई, स्वस्तिक, माझ्या दारातील सोनचाफ्याचे झाड, देवराई अशा मोजक्याच काव्य संग्रहांमधून आपल्या प्रतिभेचा परिचय दिला आहे.
पॉप्युलरचे रामदास भटकळ आणि नवल, मोहिनीचे आनंद अंतरकर यांच्याशी सावंतांची घट्ट मैत्री. या मित्रांनीच त्यांना अधिक लिहिते केले आणि त्यांची कविता रसिकांसमोर आणली. उगवाई या त्यांच्या काव्यसंग्रहात जवळपास ऐंशी कवितांचा समावेश केला आहे.
मी रोज थोडा थोडा काळोख पितो
मी रोज मला नकळत उगवत जातो
अशी अनोखी शब्दकळा कवीची. कविता या साहित्यप्रकारात कवीला जास्त सजग राहणे गरजेचे असते. शब्दांचा फाफट पसारा न मांडता मोजक्याच ताकदवान शब्दानिशी त्याला अपेक्षित अर्थ व्यक्त करायचा असतो. त्यामुळे प्रतिभेच्या जोडीला शब्दसाधना आणि अभ्यास करत कवी कविता करतो.
रोजच आपल्याला समोर दिसणाऱया घटना या कवींच्या नजरेलाही दिसतात, पण त्याचा अन्वयार्थ वेगळ्या पद्धतीने कवी आपल्याला दाखवतो.
सूर्याचे उगवणे हीच जणू एक देवी आहे असे कल्पून त्यांनी तिला उगवाई हे नावही दिले आहे, तिची स्तुतीही केली आहे.
आई, उगवाई, तुला फुटे सूर्यबिंब
तेणे माझ्या घरादारा, मला, अमृताचे कोंब
कवी हा शब्दसृष्टीचा ईश्वर असतो. तो अर्थातच कुणाचाही गुलाम नसतो. प्रतिभेचे, बुद्धिमत्तेचे उपजत देणे हे जबाबदारीने वापरायचे आहे याची जागी जाणीव त्याच्यापाशी असते. म्हणून तो स्वतच्या आत निर्भीडपणे डोकावू शकतो, स्वतला स्वच्छ सोलून समोर मांडू शकतो. सावंतांची कविता गझल, निरनिराळे छंद यामधून मुक्तपणे बागडत, मुक्तछंदातही जाते. तिला ओळींचे, शब्दांचे बंधन नकोय.
कविता सुचल्याच्या क्षणी तीव्रतेने ज्या ओळी तिने धारण केल्या, तोच तिचा छंद. असे असले तरी छंदशास्त्राचे सर्व नियम त्यांनी लिहिताना पाळलेले आहेतच.
पहाटते अजूनही,
धुके पडते तळ्यात
तुझी चाल तुझी छाया,
नाही मावत डोळ्यात
निसर्गाचे नयनरम्य सोहळे कविता दाखवते तसेच त्यामुळे कवींच्या मनातील संज्ञाप्रवाहांना वाहते करते. प्रेम ही तर कवींची आवडती भावना. आजवर हजारो कवींनी मनातील प्रेमाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला आहेच, पण सावंतांच्या कवितेत प्रेम काही निराळेच रूप धारण करतो.
तू अशी, फिरशी पिशी
डोळ्यात काळी, जांभळे
कण कण कण, झुरूनिया झाली
कृष्णाची मुरली, स्वरराधा
असे असून सावंत हे समाजशील आहेत. कवी म्हणजे केवळ स्वतच्या आत डोकावत आत्ममग्न राहणारा जगावेगळा नाही, तर या समाजाचे तो देणे लागतो हे भान त्याला असायला हवे. समाजात ज्या विसंगती दिसतात त्यावर टीकेची झोड उठवायला कवीची लेखणी कचरता कामा नये. या आभाळाखाली एक जल्लोष असतो…
अंती कुणी कुणाचे नसते
मी माणसाला शोधतो आहे
भारतीय पुराणे, मिथककथा यांनी आपल्या साहित्यात मोलाची भर घातली आहे. कृष्ण, राधा, गवळणी ही रूपके सावंत आपल्या कवितेत वापरताना त्यांना आजच्या परिप्रेक्ष्यात आणतात आणि एक वेगळीच दृष्टी वाचकाला देतात.
गौळणी उन्हाच्या, निघाल्या पाणिया
कोरडय़ा घागरी, अदृश्य कान्हया
परंपरा आणि नवता हा साहित्याच्या प्रांतातील एक चर्चेचा विषय असतो आणि साहित्यात नवनवे प्रयोग सातत्याने करणारी मंडळी या वादापासून नेहमीच दूर राहतात. मानवी मूल्ये, भावना या सार्वकालिक समान असल्याने त्यांच्या अभिव्यक्तीत कालानुरूप बदल घडले तरी त्याने मोठा फरक पडत नाही. वसंत सावंत आपल्या कवितेत मराठी भाषेत रूळलेले आधुनिक इंग्रजी शब्द सहजतेने वापरतात आणि त्यामुळे कवितेच्या सौंदर्याला कुठेही बाध येत नाही.
लेखणीला उगवाईचे टोक घेऊन आलेली सावंतांची कविता वाचकाला उजेडाचे आश्वासन देते.

[email protected]