आधार अपडेट 25 रुपयांनी महागले; नाव, पत्ता बदलण्यासाठी आता 50 रुपयांऐवजी 75 रुपये मोजावे लागणार

देशात आधीच महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण आहे. त्यात आता आधारकार्ड अपडेटसाठी लागणाऱ्या शुल्कात यूआयडीएआयने 25 रुपयांची वाढ केली आहे. आधारकार्डवरील चुकीचे नाव, पत्त्यात बदल करण्यासाठी आता 25 रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. आधार अपडेटसाठी आधी 50 रुपये मोजावे लागत होते, परंतु आता 1 ऑक्टोबर 2025 पासून यासाठी 75 रुपये मोजावे लागतील. हे नवीन शुल्क 30 सप्टेंबर 2028 पर्यंत लागू राहील. त्यानंतर याचा आढावा घेऊन 1 ऑक्टोबर 2028 पासून 30 सप्टेंबर 2031 पर्यंत शुल्क सुधारित केले जाईल, असे भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने सांगितले आहे.

नवीन आधारकार्ड काढणे हे देशातील सर्व नागरिकांसाठी मोफत आहे, परंतु आधारकार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आता 75 रुपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच बायोमेट्रिक अपडेटसारख्या सेवा आतासुद्धा महाग करण्यात आली असून या सेवेसाठी 100 रुपयांऐवजी आता 125 रुपये मोजावे लागतील. माय आधार पोर्टलद्वारे ओळख आणि पत्ता कागदपत्रे अपडेट करणे 14 जून 2026 पर्यंत मोफत आहे, परंतु नोंदणी केंद्रावर हे अपडेट आता 75 रुपये (पूर्वी 50 रुपये) असेल. त्याच वेळी 1 ऑक्टोबर 2028 पासून 75 रुपयांच्या सेवेची किंमत 90 रुपयांपर्यंत वाढेल. 125 रुपयांच्या सेवा आता 150 रुपयांना मिळतील, असे सांगितले आहे. आधारकार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. आधारकार्डमुळे बँक खाते उघडणे किंवा सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होते.

घर नोंदणीसाठी मोजा 700 रुपये

गृह नोंदणी सेवेसाठी आता यूआयडीएआय 700 रुपये शुल्क आकारणार आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश आहे. एकाच पत्त्यावर अधिक लोक माहिती अपडेट करत असतील तर पहिल्या व्यक्तीला 700 रुपये आणि उर्वरित प्रति व्यक्तीला 350 रुपये द्यावे लागतील. गृह नोंदणी सेवेमध्ये यूआयडीएआय कर्मचारी आधारशी संबंधित कामे करण्यासाठी घरी भेट देतात. जे लोक आधार केंद्रात जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही सेवा चांगली आहे.

छोटय़ा मुलांसाठी मोफत

6 ते 7 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आणि 15 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट करणे मोफत आहे. 7 ते 15 वर्षांखालील मुलांसाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत बायोमेट्रिक अपडेटदेखील मोफत आहेत, तर अन्य बायोमेट्रिक अपडेट्ससाठी 125 रुपये मोजावे लागतील. जर बायोमेट्रिक अपडेट्ससह नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता,संपर्क तपशील यांसारखे अपडेट्स केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.