
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप विश्वयुद्धाची अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.या ऐतिहासिक सामन्यासाठी देशभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत असून, टीम इंजियाच्या विजयासाठी ठिकठिकाणी प्रार्थना आणि धार्मिक विधी केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उज्जैनचे भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी भेरूगड येथील माँ बगलामुखी मंदिरात विशेष ‘मिर्ची यज्ञ’ केले. यावेळी खासदारांनी विजयाचा संकल्प सोडत यज्ञात मिरची आहुती दिली.
या विशेष पूजेचे आयोजन मंदिराचे महंत रामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो समोर ठेवून 51 भिक्षूकांनी सुमारे एक तास मंत्रोच्चार करत पूजा-अर्चा केली. या अनुष्ठानामध्ये लाल मिरची, मोहरी आणि इतर विविध पूजन साहित्याचा वापर करून ‘टीम इंडिया’चा विजय व्हावा, यासाठी माता बगलामुखीकडे साकडे घालण्यात आले.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. कोट्यवधी हिंदुस्थानींच्या नजरा या सामन्याकडे लागल्या असून, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला जात आहे. उज्जैनमधील या अनोख्या अनुष्ठानाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून, क्रिकेट आणि श्रद्धा यांचा एक अनोखा संगम यानिमित्ताने पाहायला मिळाला आहे.
प्रयागराजमधील संगम तट असो वा वाराणसीचा सिंधिया घाट, प्रत्येक ठिकाणी क्रिकेट प्रेमींकडून माँ गंगेची आरती करून टीम इंडियाच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले. काशीमध्ये, सिंधिया घाटावर वेदांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विधिवत गंगेचे पूजन केले. हातात खेळाडूंचे पोस्टर्स घेऊन, ‘स्वस्तिवाचन’ आणि मंत्रोच्चाराच्या गजरात त्यांनी टीम इंडियाचा उत्साह वाढवला. दुसरीकडे, प्रयागराजच्या दशाश्वमेध घाटावर चाहत्यांनी एकत्र जमून विजयाचा संकल्प केला.
झाशी येथील पंचदेव मंदिरातही ‘विजयी भव’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. येथे टीम इंडियाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी ‘शत्रुनाशक हवन’ करण्यात आले. देशभरातून मिळणाऱ्या या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे खेळाडूंचे मनोबल वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या विजयामुळे केवळ जेतेपदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही, तर अहमदाबादच्या मैदानाशी जोडलेली पराभवाची जुनी आठवणही पुसली जाईल, अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
























































