
आखाती देशांमधील वाढता तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील बिघडलेली परिस्थिती पाहता, ब्रिटनने ३५ देशांची एक महत्त्वाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या आपत्कालीन बैठकीत हिंदुस्थानलाही आमंत्रित करण्यात आले असून, जागतिक ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हिंदुस्थानची भूमिका अत्यंत कळीची ठरणार आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने केलेले नियंत्रण आणि त्यातून निर्माण झालेला अडथळा यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय जलमार्गांची सुरक्षा आणि व्यापारी जहाजांचा विनाअडथळा प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ब्रिटनने हा पुढाकार घेतला आहे. या बैठकीत युरोपीय देशांसह, आशियाई आणि अरब राष्ट्रांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.
हिंदुस्थान आपल्या गरजेच्या कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गावरून आयात करतो. त्यामुळे होर्मुझमधील कोणत्याही प्रकारचा संघर्ष हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करू शकतो. दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, इराणमधील विविध भागांतून सुमारे १२०० हिंदुस्थानी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
जयस्वाल म्हणाले की, एकूण १,२०० हिंदुस्थानींपैकी ९९६ जणांना अर्मेनियाला आणि २०४ जणांना अझरबैजानला पाठवण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालय दोन्ही देशांतील हिंदुस्थानी दूतावास आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयाने, या नागरिकांच्या सुरक्षित परतीची खात्री करत आहे. त्यांच्या प्रवासात मदत करण्यासाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ब्रिटनने हिंदुस्थानला होर्मुझ विषयावर होणाऱ्या ३५ देशांच्या चर्चेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी या बैठकीला व्हर्च्युअली उपस्थित राहतील.




























































