
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत ट्रम्प यांनी झेलेंस्की यांना लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र ‘टोमहॉक’ क्रूज मिसाइल देण्यास नकार दिला आहे. पुढील आठवडय़ात डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन हे हंगरीची राजधानी बुडापेस्ट मध्ये भेटणार आहे. झेलेंस्की आणि पुतीन यांच्या थेट चर्चा होणे अवघड आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटलेय.
लढाऊ विमानासाठी 654 अब्जाची तरतूद
हिंदुस्थान सरकार पुढील दशकभरात लढाऊ विमानाच्या इंजिनाची खरेदी करणे आणि अन्य विकासावर तब्बल 654 अब्ज रुपये म्हणजेच 7.44 अब्ज डॉलर खर्च करणार आहे. हिंदुस्थानला आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच संरक्षण क्षेत्रात स्वदेशी क्षमतेला आणखी मजबूत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशाला विविध लढाऊ जेट कार्यक्रमासाठी जवळपास 1100 इंजिनची आवश्यकता आहे, असे डीआरडीओचे एसव्ही रमना मूर्ती यांनी म्हटले आहे.
गरीब रथ एक्सप्रेसला पंजाबमध्ये आग
पंजाबच्या लुधियानाहून दिल्लीला जात असलेल्या गरीब रथ ट्रेनच्या डब्याला शनिवारी सकाळी पंजाबच्या सरहिंद स्टेशनजवळ आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले. आगीची माहिती समजताच लोको पायलटने तत्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. ट्रेन थांबताच प्रवासी डब्यातून खाली उतरले. या डब्यातून अनेक व्यापारी प्रवास करत होते. या दुर्घटनेत काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती समजताच रेल्वेची टीम घटनास्थळी पोहोचली व आगीवर नियंत्रण मिळवले.