उल्हास नदीचे पाणी पिण्यालायक आहे का? प्रदूषण नियंत्रण मंडळाला नागरिकांचा सवाल

सांडपाणी आणि जलपर्णीच्या विळख्यामुळे उल्हास नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घेतली असली तरी सांडपाणी रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असताना उल्हास नदीचे पाणी पिण्यालायक आहे का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या भागातील नागरिकांना उल्हास नदीतून पाणीपुरवठा केला जातो. या नदीत बदलापूरपासून कल्याणपर्यंत ठिकठिकाणी घरगुती आणि रासायनिक सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे नदीतील पाणी दूषित झाले आहे. तसेच पाण्यावर जलपर्णीचे आच्छादन असल्याने पाण्याच्या शुद्धतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नदी वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या ‘मी कल्याणकर’ संस्थेच्या वतीने पाण्याची शुद्धता तपासण्याची मागणी करण्यात आली होती.

पाण्यात प्रदूषित घटक किती प्रमाणात आहेत याचा उलगडा अहवालानंतर होणार आहे.

आपण पित असलेले पाणी किती प्रदूषित आहे हे समोर येणार आहे. अहवाल लवकरात लवकर मिळविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नदीपात्रातील जलपर्णी पाहता काम व्यापक व खर्चिक असल्यामुळे याबाबत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या.

म्हारळ, वरप ग्रामपंचायत येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थिती व जागेच्या नियोजनाबाबत चर्चा सुरू असून कांबा येथील घनकचरा व्यवस्थापन जागेची पाहणी केली आहे.

पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत
प्रदूषण नियंत्रण मंडळाने 70 ठिकाणांचे पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. या पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाणार असून उल्हास नदीतील पाणी प्रदूषित किंवा पिण्यायोग्य आहे की नाही हे दोन आठवड्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी सांगितले.