
उल्हासनगर महापालिकेने राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने राबवलेल्या विशेष मालमत्ता कर भरणा योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात थकबाकीदारांना चालू मागणीसह एकरकमी संपूर्ण थकबाकी भरल्यास 100 टक्के विलंब शुल्क माफी देण्याची सुविधा देण्यात आली होती. या संधीचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत एकाच दिवसात विक्रमी 5 कोटी 19 लाख 51 हजार 321 रुपयांची भर पडली.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने 13 सप्टेंबर रोजी पालिकेत एक दिवसीय मालमत्ता कर भरणा योजना राबवण्यात आली होती. या योजनेत नागरिकांनी चालू मागणीसह एकरकमी संपूर्ण थकबाकी भरल्यास 100 टक्के विलंब शुल्क माफी देण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे एकाच दिवशी विक्रमी 5 कोटी 19 लाख 51 हजार 321 रुपये इतकी करवसुली झाली.
धनदांडग्यामुळे थकबाकी वाढली
उल्हासनगर महापालिकेने थकीत मालमत्ता करवसुलीसाठी फेब्रुवारी महिन्यात अभय योजना लागू केली होती. पालिका प्रशासन मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांना सवलत देत असले तरी नागरिकांकडून वेळेत भरणा केला जात नसल्याची बाब समोर आली. त्यातही सर्वसामान्य नागरिक त्यांचा कर नियमितपणे भरत असला तरी मोठे धनदांडगे थकबाकीधारक कर थकवतात. त्यांच्याकडे मालमत्ता कराचा थकीत आकडा कोटींच्या घरात आहे.